नांदेडमध्ये ‘रिंदा’ गॅंग पुन्हा सक्रीय, दोघांवर गुन्हा दाखल

प्रल्हाद कांबळे
Monday, 12 October 2020

एका व्यापाऱ्याला रिंदाचे नाव सांगुन खंडणी मागितली. एवढेच नाही तर खंडणी नाही दिली तर गोळी घालु अशी धमकी दिली. या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ता. १० आॅक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास शहरामध्ये घडला. 

नांदेड : शहर व जिल्ह्यातील रिंदा गॅंगच्या टोळीची तत्कालीन पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी आर्थीक कमर तोडली होती. अनेकांना मोक्काअंतर्गत कारवाई करुन कारागृहात पाठविले. अजूनही अट्टल गुन्हेगार राज्याच्या विविध कारागृहात शासकिय पाहूणचार घेत आहेत. मात्र नुकतीच श्री. मगर यांची बदली झाल्याने पुन्हा या टोळीने आपले डोके वर काढले आहे. एका व्यापाऱ्याला रिंदाचे नाव सांगुन खंडणी मागितली. एवढेच नाही तर खंडणी नाही दिली तर गोळी घालु अशी धमकी दिली. या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ता. १० आॅक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास शहरामध्ये घडला. 

नांदेड शहरात व भोकर परिसरात नुकत्याच दोन गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. त्यात नांदेड शहरातील गोळीबार करुन व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात एक पानठेलाचालक किरकोळ जखमी झाला होता. यातील चार हल्लेखोर पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या पथकाने त्याच रात्री अटक केली होती. सध्या हे चारही हल्लेखोर पोलिस कोठडीत आहेत. यांचा फक्त परिसरात व व्यापाऱ्यामध्ये भिती निर्माण करुन खंडणी गोळा करायची हा होता. मात्र त्यांचा डाव फसला. 

हेही वाचानांदेडला वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात -

भोकरच्या गोळीबारातील आरोपी फरार 

तर दुसऱ्या घटनेत भोकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका सराफा व्यापाऱ्याला रस्त्यात अडवून हवेत गोळीबार करुन त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याचे दागिणे असा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणातील आरोपी मात्र पोलिसांच्या तावडीत सापडले नाहीत. या दोन घटना ताज्या असतानाच खंडणीखोरांनी पुन्हा आपले डोके वर काढले आहे. खंडणीखोरांची नांगी ठेचणार असल्याचे पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी सांगितले होते. तरीसुध्दा ही टोळी सक्रीय झाल्याने व्यापारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. 

येथे क्लिक कराबोराळा हादरले : तीन दिवसांत तीन शेतकरी युवकांची आत्महत्या 

वजिराबाद पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा 

वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या इंदरजीतसिंग यांच्या मालकीचे असलेल्या हॅगर कापड दुकानासमोर ता. १० आॅक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास आपल्या मित्राला बोलत दिलबागसिंग लखविंदरसिंग रंधवा (वय २६) हा बोलत थांबला होता. यावेळी त्याच्याजवळ याच परिसरातील सोनु गील आणि लालो हे दोघेजण गेले. सोनु गील याने दिलबागसिंग याचे कॉलर पकडून रिंदाचे नाव सांगुन खंडणी मागितली. यावेळी त्याच्यापासून त्याने सुटका करुन घेतली. काही अंतरावर जावून पुन्हा त्याच्याशी वाद घालून खंडणी नाही दिली तर लालो याने त्याला गोळी घालण्याची धमकी दिली. या प्रकरणी दिलबागसिंग रंधवा यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल पुंगळे करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rinda gang reactivates in Nanded crime nanded news