हदगांव शहरात दरोडा; अकरा लाखांचा ऐवज लंपास

गजानन पाटील
Friday, 24 July 2020

घरमालक व मोलकरणीचे हात बांधुन, आरडा-ओरड केल्यास दिली जीवे मारण्याची धमकी

हदगांव (जिल्हा नांदेड) : शहराच्या मध्यठिकाणी असलेल्या जानकीलाल राठी चौकातील हरीप्रसाद सारडा यांच्या राहत्या घरी चार ते पाच दरोडेखोरांनी घराचा दरवाजा ठोठावून घरमालकांनी दरवाजा उघडताच आतमध्ये प्रवेश करत त्यांचे हात बांधुन कपाटाच्या चाव्यांची मागणी केल्यानंतर घरातील सोने व नगदी रोखरक्कम दोन लाख रुपये असा एकुण ११ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. श्री सारडा यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता त्या दरोडेखोरांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देत तेथुन लगेचच पोबारा केला. ही घटना गुरुवार (ता. २३) च्या पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक अवधुत कुशे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार करीत आहेत.

येथील मध्यवस्तीतील चौकात कापडाचे व इतर व्यापार करणारे व्यापारी हरीप्रसाद सारडा यांचे गेली कित्येक वर्षांपासून मुख्य बाजारपेठेत खाली दुकान आणि पहिल्या मजल्यावर सहा खोल्यांचे राहते घर आहे. त्यांची इमारत भली मोठी असुन याठिकाणी भाड्यानेही त्यांनी मोठ्या प्रमाणात खोल्या दिलेल्या आहेत. त्यांच्या घरामध्ये ते एकटेच राहत असुन त्यांची मोलकरीण सरुबाई हीदेखील सोबतच राहते असे कळते. श्री हरीप्रसाद सारडा यांचा मुलगा व सुन हे दोघेही त्यांच्याच स्वतःच्या मालकीच्या समोरच्या इमारतीत राहत असल्याचे कळते. सर्व दरोडेखोर २० ते २५ वयोगटातील असुन या दरोडेखोरांना आपण पाहताक्षणी ओळखु शकतो असे श्री हरीप्रसाद सारडा यांनी आपल्या फिर्यादीत कळविले असल्याने दरोडेखोरांनी आपल्या चेहऱ्यावर काहीच बांधले नव्हते हे स्पष्ट होते. 

लोखंडी रॉडने मारण्याची त्यांना धमकी

श्री सारडा यांनी दरोडेखोरांनी दरवाज्यावर थाप मारलेली ऐकताच दरवाजा उघडताक्षणी दरोडेखोरांनी 'सोना निकालो, पैसा निकालो' म्हणत घरमालकांचे हात तेथील कपड्याने बांधले. त्याचक्षणी मोलकरीण असलेल्या सरुबाईंनाही त्यांनी गप्प बसण्याची धमकी दिली. 'रुमकी चावी देवो' असे म्हटल्यानंतर चावी देण्यासाठी श्री सारडा विलंब लावत असल्याने लोखंडी रॉडने मारण्याची त्यांना धमकी देताच त्यांनी उशीखाली ठेवलेली चावी दिली. यावेळी एक दरोडेखोर हरीप्रसाद सारडा यांच्याजवळ तर दुसरा मोलकरीण असलेल्या सरूबाईजवळ उभा टाकलेला होता. बाकीचे तिघे जनांनी आतमधल्या खोलीत जाऊन कपाटातील रोख रक्कम नगदी दोन लाख व सोन्याचे दागिने असा एकूण ११ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची फिर्याद हरीप्रसाद सारडा यांनी पोलीस स्टेशनला दिली.

हेही वाचा नांदेड जिल्ह्यात आजपासून काय बंद, काय सुरु राहणार...? वाचा....

'चलो आपुन सामनेके खोल्या देखेंगे'

त्यानंतर दरोडेखोर यांनी 'चलो आपुन सामनेके खोल्या देखेंगे' म्हणत दरोडेखोर त्या ठिकाणाहून पळून गेले.
यानंतर श्री सारडा यांनी आपले बांधलेले हात कसेबसे सोडवून आपल्या हॉलचा दरवाजा आतमधुन लावून घेत मुख्य रोडवरील खोलीचा दरवाजा काढुन गॅलरीतुन आपला मुलगा व सुनेला मोठमोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांचा मुलगा व सुन व शेजारील बशारत बेगम आणि त्यांची मुले हातात काठ्या घेऊन पळत आले. एकंदरीत हरीप्रसाद सारडा यांच्या घराबाबत व त्यांच्या शेजारी नेमके कोणकोण राहतात याबाबतची सर्व इत्यंभूत माहिती त्या दरोडेखोरांना असुन एकटे राहतात याचा गैरफायदा घेतला. पोलिसांनी तपासाची सुत्रे हलवत या घटनेनंतर एका संशयीतास  ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व सर्व पथकाने या सर्व घटनेनंतर भेट देऊन सर्व सविस्तर माहिती घेत आरोपींना तात्काळ जेरबंद करण्याबाबत जोरदार हालचाली चालविल्या असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सारडा यांचा शहरात 'घेवाणदेवाणीचा' मोठा 'व्यापार'

येथील कपडा व्यापारी म्हणुन नाममात्र व्यापारी असलेले हरीप्रसाद सारडा यांचे बाजारपेठेत फार मोठे वाटप असुन सोने ठेवून ते व्याजाने पैसे देण्याचा त्यांचा खराखुरा व्यापार आहे हे सर्वश्रुत आहे. अशी जोरदार चर्चा या दरोड्यानंतर चर्चिल्या गेली. श्री सारडा यांचा घेण्यादेण्याचा व्यापार वर्षानुवर्षापासूनचा असल्याने व त्यांचे घरी ते एकटेच राहतात याची सर्व खबरबात ठेऊनच दरोडेखोरांनी त्यांचे घरी दरोडा टाकला. नगदी दोन लक्ष व सोन्याचे दागिणे असा एकुण ११ लक्ष रुवयांचा ऐवज दराडेखोरांनी लंपास केला असल्याची फिर्याद जरी श्री सारडा यांनी दिली असली तरी वास्तविक पाहता फार मोठ्या प्रमाणात सोने आणि नगदी रोख रक्कम दरोडेखोरांनी लंपास केली असली पाहीजे. असा अंदाज शहरातील अनेकांकडून वर्तविला जात आहे. अधिकची रक्कम व सोने गेल्याचे दाखविल्यास त्या सर्व रोख रक्कमेचा व दागिन्यांचा हिशोब द्यावा लागेल या आयकर विभागाच्या भितीने आकडा कमी दाखविण्यात आल्याचेही यानिमित्ताने चर्चिल्या जात आहे. दरोड्याचा तपास करत असतांनाच श्री सारडा यांच्या संपुर्ण संपत्तीची व घेवाणदेवाणीच्या व्यापाराची व त्यांचेकडे व्याज-दिडया करण्याचे लायसन आहे का याचा तपासही होण्याची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे यानिमित्ताने चर्चिल्या जात आहे.
 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbery in Hadgaon city; looted Rs 11 lakh Robbery nanded news