पहिलीत प्रवेशापूर्वीच विद्यार्थ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा


 RTE admission

पहिलीत प्रवेशापूर्वीच विद्यार्थ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार!

नांदेड : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अधिनियमातंर्गत सीबीएससी पॅटर्नच्या सर्व शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवणे अनिवार्य आहे. त्यासाठी विद्यार्थाचे वय सहा वर्ष दोन महिने असणे आवश्‍यक आहे. मात्र, कोरोना काळात अनेक पालकांना पाल्याचा आरटीई प्रवेश अर्ज भरता आला नाही. अशा विद्यार्थ्यांचे वय वाढल्याने त्या विद्यार्थ्यांना पहिलीच्या वर्गात प्रवेशापूर्वीच अपात्र ठरविले जात असल्याचे चित्र आहे.

सध्या नांदेड तालुक्यातील ६१७ शाळांपैकी २४३ शाळा ह्या आरटीई अंतर्गत येतात. दोन हजार २९० जागेसाठी अर्ज भरण्यात येतात. बुधवारी (ता. नऊ) सायंकाळपर्यंत आरटीई प्रवेशासाठी नांदेड तालुक्यातील शाळांसाठी सात हजार ४८ अर्ज प्राप्त झाले आहेत. असे असले तरी, अनेक गरजू विद्यार्थ्यांना वय वाढल्याने प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे. कोरोना काळात सलग दोन वर्ष अनेकांच्या हाताला काम नव्हते. मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने निर्बंध कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कुठे हाताला काम लागत आहे.

दुसरीकडे शाळा, महाविद्यालय सुरु झाल्याने विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जात आहे. मात्र, कोरोनाने आरटीईला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या गरजवंत पालक व विद्यार्थ्यांचा चांगलाच हिरमोड केला आहे. ज्या बालकांचे वय सहा वर्ष तीन महिने झाले असेल त्यांना आॅनलाइन प्रवेश अर्ज करता येणार नाही, अशी शासनाच्या पोर्टलवर तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पालकांना झटका बसत आहे. जी मुले साडेसहा वर्षाची झाली त्या पालकांना शाळेची पूर्ण फीस भरुन इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घावा लागणार आहे. त्याशिवाय इतर कुठलाही पर्याय नाही.

पालकांची नाराजी व्यक्त

एकीकडे आरटीईच्या नावाखाली सक्तीचे शिक्षण म्हणायचे आणि दुसरीकडे पालकांची अडवणूक करायची असला प्रकार होत असल्यामुळे अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ज्या मुलाचे वय सहा वर्ष पूर्ण झाले आहे. अशा बालकांना वर्षभरातून कधीही आरटीईला आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठीची तरतूद केली जावी, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.

Web Title: Rte Admission Students Age Restriction News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NandedRTE
go to top