नियमाला मिळाली शिथिलता ‘अन्’ कार्यालये ‘लॉक’ 

शिवचरण वावळे
Wednesday, 7 October 2020

शासकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टरांचे अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने त्याचा त्यांच्या आरोग्यासह त्यांच्या कामावर देखील परिणाम जाणवू लागला आहे.

नांदेड - कोरोनाचे संक्रमण वाढले असले तरी लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्याने अनेक उद्योग, व्यवसाय तसेच शासकीय व्यवहार हळहळू पूर्वपदावर येत आहेत. मात्र, लॉकडाउननंतर देण्यात आलेल्या या सवलतीचा अनेक ठिकाणी गैरफायदा घेतला जात आहे. कोरोनाच्या नियमांचे काही ठिकाणी अजूनही पालन केले जात नसल्याने त्याचा थेट परिणाम अधिकारी व कर्मचारी यांच्यात कोरोनाचे संक्रमण वाढल्याने जाणवू लागला आहे. 

मागील सहा महिन्यापासून कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत होता. त्यामुळे उद्योग, व्यवसाय, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय व बँका बंद ठेवण्यात येत होत्या. परंतु, या दरम्यान अनेक क्षेत्रांना नुकसान सहन करावे लागत होते. राज्याची अर्थव्यवस्था ढासळल्याने सहा महिन्यानंतर लॉकडाउनमध्ये कोरोना संक्रमण रोखण्यासाठी काही नियम घालून देत बहुतेक उद्योग, व्यवसाय, शासकीय व निमशासकीय कार्यालय सुरु ठेवण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. 

हेही वाचा- वय कोवळे पण गुन्हेगारी करणे भोवले ​

शारिरिक अंतर न पाळणे कर्मचाऱ्यांच्या मुळावर

शासकीय अथवा खासगी कार्यालयात प्रवेश करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ते कार्यालयात प्रवेश करणाऱ्या अभ्यांगतांनपर्यंत सर्वांनाच तोंडाला मास्क, सॅनिटायझरचा वापर, शारिरिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग ) नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. ज्यांच्या तोंडाला मास्क किंवा सॅनिटायझरचा वापर न करणाऱ्या व्यक्तीला कार्यालयात प्रवेश न देणे हे शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या हातात आहे. परंतु त्या शासकीय कार्यालयात सॅनिटायझर किंवा हात धुण्यासाठी हॅन्डवॉश न ठेवणे त्यापेक्षाही शारिरिक अंतर न पाळणे अशा चुका होत असल्याने त्याचा थेट परिणाम हा त्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर होत असून त्यांना देखील कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. 

हेही वाचले पाहिजे- हवेत गोळीबार करून चोरट्यांनी सराफ व्यापाऱ्यास लुटले ​

शासकीय अधिकारी - कर्मचारी कोरोनाच्या कचाट्यात 

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका, शासकीय व खासगी रुग्णालयातील अनेक अधिकारी, कर्मचारी कोरोना संक्रमणाच्या विळख्यात सापडत आहेत. यात विविध बँका आणि शासकीय व खासगी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची सर्वाधिक संख्या असल्याचे दिसून येते. शासकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टरांचे अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने त्याचा त्यांच्या आरोग्यासह त्यांच्या कामावर देखील परिणाम जाणवू लागला आहे. शहरातून फिरताना बँका वा शासकीय कार्यालयात कोरोना रुग्ण आढळुन आल्याने त्या कार्यालयाच्या गेटवर बँकेतील कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने उर्वरीत कर्मचाऱ्यांचे अहवाल येईपर्यंत बँकेचे कामकाज बंद ठेवण्यात येत असल्याचे फलक बाहेर झळकताना दिसत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The rules have been relaxed and the offices have been locked Nanded News