वय कोवळे पण गुन्हेगारी करणे भोवले

file photo
file photo

नांदेड - गेल्या काही दिवसात नांदेडमध्ये गोळीबाराच्या आणि खंडणी वसुलीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यात धोक्याची बाब म्हणजे तरुण आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्यांचाही समावेश पोलिस तपासात पुढे आला आहे. त्यामुळे तरुणाई गुन्हेगारी जगताच्या विळख्यात जाण्याआधीच पालकांनीही सजग राहणे तेवढेच अत्यावश्यक बनले आहे. 

जुना मोंढा भागातील गोळीबाराची आणि खंडणी वसुलीची घटना असो की त्या आधी घडलेल्या घटना. यामध्ये तरूणांचा सहभाग वाढत असल्याचे दिसून आले आहे. नूतन पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी देखील पत्रकार परिषदेत ही बाब स्पष्ट केली. आरोपींचे वय १८ ते २४ च्या दरम्यान आहे. त्याचबरोबर त्यातील काही जणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचेही तपासात पुढे आले आहे. 

गांभिर्याने पाहणे अत्यावश्यक 
याबाबत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप देशपांडे म्हणाले की, सामाजिक दृष्टीकोनातूनही या विषयाकडे गांभिर्याने पाहणे अत्यावश्यक वाटते. तरूण पिढीसमोर आपण कोणते आदर्श ठेवत आहोत, याचा विचार झाला पाहिजे. आजच्या तरुण पिढीसमोर उधळ आणि पोकळ आदर्श निर्माण होत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या हातात असलेला स्मार्ट फोन. मोबाईल ही गरजेची वस्तू असली तरी त्याचा वापर एवढा वाढला आहे की ती विनाकारण अत्यावश्यक होत चालली आहे. मोबाईलमुळे त्यांचा स्क्रीन टाईम वाढत चालला आहे. मोबाईलच्या प्रभावामुळे आपआपसातील नातेसंबंध बिघडत चालले आहेत. त्याचबरोबर तरुणाई आव्हानाला सामोरे जाण्यास घाबरत असून जवळपास १५ ते २० टक्के पिढी ही नैराश्येत चालली आहे. त्यांच्या भावनांना वाट मिळत नसल्याचे दिसून येत आहे. 

तरुणाई ग्लॅमरला बळी पडतेय
तरूणाई ग्लॅमरलाही बळी पडत असून झटपट पैसा मिळविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगून डॉ. देशपांडे म्हणाले की, पैसा की मूल्य असा प्रश्न ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी तरुणाई पैशाकडे आकृष्ट होत आहे. मूल्यांना महत्व कमी आणि पैसाला जास्त झाल्यामुळे मूल्य आधारित संस्कृती ऐवजी पैसे आधारित संस्कृती झाली आहे. ज्याच्याकडे जास्त पैसा तो श्रीमंत ही बाब खटकणारी आहे. 

हरवत चाललेला संयम  
सध्याचा जमाना फास्टफूडचा झाला आहे. त्यामुळे सगळेच तरूणाईला फास्ट पाहिजे. त्यातून तरुणांचा संयम कमी होत चालला आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात कोणतेही पाऊल उचलण्यास तरुणाई मागेपुढे पाहत नाही. पूर्वी कोणत्याही व्यसनांकडे कलंकित नजरेने पाहिले जायचे मात्र, आता व्यसनांनाही ग्लॅमर प्राप्त होत आहे. त्याचाही मानसिक आणि शारिरिक परिणाम होत असल्यामुळे तरुणाईने संयमित जीवन जगण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे.    
- डॉ. संदीप देशपांडे, मानसोपचारतज्ज्ञ, नांदेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com