
नायगाव : रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द अटळ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी भारतात परतण्यासाठी तेथील विमानतळावर जात असताना हल्ल्यात विमानतळच नष्ट करण्यात आले. त्यामुळे परत निघालेल्या नायगाव तालुक्यातील परडवाडी येथील संजीवनी हनमंतराव वनाळेकर ही विद्यार्थ्यीनी अडकून पडली असून इकडे कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सरकारने परत आणावे अशी मागणी वनाळेकर परिवाराने केली आहे.
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर तिथे युद्धाला सुरुवात झाली आहे. अचानकपणे सुरू झालेल्या या युद्धामुळे अनेक परदेशी नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. यात भारतीयांचाही समावेश आहे. अडकलेल्या या भारतीयांमध्ये नायगाव तालुक्यातील एका मुलीचा समावेश असून. कु. संजीवनी वनाळेकर ही युक्रेनमधील चर्नीव्हतसी शहरातील बुकोव्हिनियन वैद्यकीय विद्यापीठात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. युक्रेनची राजधानी असलेल्या किव शहरापासून चर्नीव्हतसी हे शहर जवळपास ५०० किमी अंतरावर आहे.
युक्रेन आणि रशियात युध्द अटळ असल्याची कल्पना येताच एमबीबीएसचे शिक्षण घेणारे जवळपास २०० विद्यार्थी कतार एअरवेजने (ता. २४) रोजी दुपारी ३.३० च्या दरम्यान भारतीय वेळेनूसार निघणार होते. त्यासाठी ते बसमधून विमानतळावर जाण्यासाठी निघाले होते पण गुरुवारी सकाळीच रशियाने हल्ला केला व अगोदर विमानतळाला लक्ष केले. या हल्ल्यात विमानतळ नष्ट झाल्यामुळे बसमधून विमानतळाकडे निघालेले विद्यार्थी वाटेतच अडकून पडले आहेत. विमानांचा आवाज, धडकणारे तोफगोळे आणि हेलिकॉप्टरच्या घिरक्यामुळे सर्व विद्यार्थी बसमध्येच अडकून पडले आहेत.
वाटेतच मागच्या चोवीस तासापासून हे विद्यार्थी वाटेतच अडकून पडल्यामुळे त्यांची मोठी अबाळ होत असून खाण्याच्या वस्तू तर सोडाच प्यायला पाणीही मिळत नसल्याने विद्यार्थी हतबल झाले आहेत. युध्दजन्य परिस्थितीमुळे भारतात निघालेल्या लेकीची गंभीर परिस्थिती पाहुन वनाळेकर परिवार चिंतेत पडला असून संजीवनीच्या भवितव्याची चिंता सतावू लागली आहे. आपल्या मुलीला भारत सरकारने सुखरूप मायदेशी आणावी अशी आर्त हाक घालत आहेत.
''युक्रेनमधून भारतात येण्यासाठी ४० हजार रुपये विमानाचे तिकीट आहे पण दोन देशामधील तणाव वाढताच विमानाचे तिकीट दोन ते तीन पट झाले असून प्रत्येक विद्यार्थ्यांकडून एक ते दिड लाख रुपये उकळण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत विमान कंपण्या मानवतेच्या दृष्टीने विचार करण्याऐवजी विदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अर्थिक लुट करीत आहेत ही अतिशय खेदाची बाब आहे.''
- हनुमंराव वनाळेकर, पालक.
''युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारी नायगाव तालुक्यातील परडवाडी येथील विद्यार्थीनी संजीवनी वनाळेकर यांची माहिती मिळाली असून जिल्हा प्रशासनाला कळवली आहे.''
- गजानन शिंदे, तहसीलदार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.