तबस्सुमला वैद्यकीय शिक्षणासाठी साईप्रसादचा आधार 

प्रमोद चौधरी
Tuesday, 27 October 2020

मदत मागणारा खरोखरच गरजवंत आहे का? याची शहानिशा करूनच साईप्रसादतर्फे मदत दिली जाते. त्यामुळे साईप्रसाद परिवार गरजवंतासाठी कल्पवृक्ष ठरत आहे.

नांदेड. :  घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही मुलीचे वैद्यकिय शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडिलांनी धडपड केली खरी;पण कोरोनामुळे हाताला काम नाही. त्यामुळे आर्थिक चणचण. त्यातच मुलीच्या द्वितीय वर्षाची फीस कशी भरावी? अशा विवंचनेत असलेल्या तबस्सुमला साईप्रसादने पन्नास हजार रुपयांची मदत दिली. 

शेख सादेर मुळचे देगलूर येथील रहिवासी. परंतु, मुलांच्या शिक्षणासाठी ते नांदेड शहरात आले. दीपनगर येथे किरायाच्या घरामध्ये ते राहतात. शहरात ड्रायव्हर म्हणून दररोज वेगवेगळ्या गाडीवर मिळेल तसे काम करून त्यांचा उदरनिर्वाह सुरु आहे. शेख सादेर यांना तीन मुले असून, त्यापैकी तबस्सुम ही खामगाव (जि.बुलडाणा) येथे वैद्यकिय शिक्षण घेत आहे. यावर्षी ती द्वितीय वर्षाला असून फीस भरण्याच्या विवंचनेत शेख सादेर होते. फिस भरली नाहीतर मुलीचे शिक्षण बंद पडते की काय, अशी काळजी त्यांना वाटू लागली. कारण मागील सात महिन्यांपासून कोरोना परिस्थितीमुळे त्यांचे काम पूर्णपणे बंदच आहे. त्यामुळे द्वितीय वर्षाची फीस व जेवण खर्च शेख सादेर यांना शक्य नव्हते. 

हेही वाचा - नांदेडचे ‘धडपड व्यासपीठ पोरके झाले : डॉ. सुरेश सावंत

अशा काळजीत असताना शेख सादेर यांनी साईप्रसादकडे संपर्क साधून तबस्सुमच्या वैद्यकिय शिक्षणासाठी मदत मागितली. साईप्रसादच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण खातरजमा करून दानशूरांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला दात्यांनी प्रतिसाद देवून दोनच दिवसामध्ये ५० हजार रुपयांची मदत दिली. ही सर्व रक्कम तबस्सुमच्या बॅंक खात्यामध्ये जमा केल्याने तीला आधार मिळाला. 

हे देखील वाचाच - नांदेड जिल्ह्यातील पंधरा जिल्हा परिषदेच्या शाळा ‘आदर्श’

गरजवंतांसाठी साईप्रसाद ‘कल्पवृक्ष’ 
साईप्रसाद परिवार नेहमीच गरजवंताला मदतीसाठी पुढाकार घेत असतो. त्यातच मागील मार्च महिन्यापासून कोरोना परिस्थितीमुळे समाजात गरीब कुटुंबांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. शिक्षण, आरोग्य, विवाह, उपजीविका चालवण्यासाठी अन्नधान्य अशा सर्व प्रकारची साईप्रसादने गरजवंतांना मदत केली. विशेष म्हणजे मदत मागणारा खरोखरच गरजवंत आहे का? याची शहानिशा करूनच साईप्रसादतर्फे मदत दिली जाते. त्यामुळे साईप्रसाद परिवार गरजवंतासाठी कल्पवृक्ष ठरत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sai Prasad Support For Medical Education To Tabassum Nanded News