Video - नांदेडमधील कोरोना बाधित रुग्णांना साईप्रसादचा आधार

प्रमोद चौधरी
Tuesday, 8 September 2020

रंजल्या गांजलेल्यांसाठी आधारवड ठरलेला साईप्रसाद परिवार कोरोना बाधित रुग्णांसाठीही आधार ठरत आहे. कोरोनापासून लवकर मुक्ती व्हावी म्हणून दररोज विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात साईप्रसादचे नाथ पौष्टिक आहाराचे वाटप बाधित रुग्णांना निःस्वार्थपणे वाटप करत आहेत.

नांदेड : रंजल्या गांजलेल्यांसाठी आधारवड असलेला साईप्रसाद परिवाराने कोरोना माहामारीमध्येही आपले कार्य अखंडित सुरु ठेवले आहे. विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांना परिवारातर्फे दररोज पौष्टिक आहार दिला जातो आहे.

नांदेड शहरातील साईप्रसाद परिवार सद्यस्थितीत रंजल्या गांजलेल्यांसाठी आधारवड ठरला आहे. आर्थिक मदतीसोबतच नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या कुटुंबियांना नव्याने उभारी मिळावी म्हणून साहित्य, शेतकरी आत्महत्या कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे म्हणून स्वयंरोजगार उभारणीसाठी मदत, सामुहिक विवाह सोहळा, अन्नदान अशा विविध सामाजिक उपक्रमांतून साईप्रसाद परिवारातील सदस्य सामाजिक बांधिलकी जपत आहे. त्यांचे हे कार्य उत्तरोत्तर वाढतच चालले आहे.

हेही वाचा - बोळकावासीयांची अशीही एकजूट

आज संपूर्ण देश कोरोना महामारीमुळे त्रस्त झालेला आहे. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊनची घोषणा २४ मार्च रोजी केली. तेव्हापासून साईप्रसाद परिवारातील सदस्यांची जबाबदारी आणखीनच वाढली. या परिवारात असलेल्या एक हजार ३०० पेक्षा अधिक सदस्यांच्या दातृत्वातून कोरोनाच्या महामारीमध्ये अनेकांना धीर देण्याचे काम केले. रुग्णालयात असलेल्या बाधित रुग्णांना आंघोळीच्या साबणीपासून ते सॅनिटायझर, चहा, नाष्टा, मास्क देण्यापर्यंतचे काम साईप्रसाद परिवाराच्या वतीने निःस्वार्थपणे केले जात आहे.

पोष्टीक आहाराचेही होतेय वाटप  
कोरोना बाधित रुग्णांमध्ये अॅन्टीबाॅडीज वाढविण्यासाठी त्यांना पौष्टिक आहाराची गरज असते. मात्र, बहुतांश ठिकाणी हा आहार शासनातर्फे दिला जातो तर काही ठिकाणी दिला जात नाही. त्यामुळे बाधित रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी साईप्रसाद परिवारातर्फे विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात दररोज शुद्ध तुपाचा शिरा ज्यात काजू ,बदाम व मनुका असलेला शिरा, सोबतच  नैसर्गिक पिकवलेले चिकू, पेंड खजूर, डाळींब, बिस्लेरी बॉटल दिली जात आहे. 

हे देखील वाचलेच पाहिजे - बारा बलुतेदारांना कधी मिळणार संवैधानिक आरक्षण?

यासाठी घेतला पुढाकार
जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यांना पौष्टिक आहार मिळावा, शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी साईप्रसादने पुढाकार घेतला आहे.  जेणेकरून कोरोना रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढावी व ते लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावेत, हा मुख्य हेतू त्यामागे आहे. असंख्य दातृत्वांच्या पुढाकारातून पौष्टिक व आरोग्यवर्धक अन्न पुरविण्याचे काम साईप्रसादचे ‘नाथ’ अखंडित करत असल्याचे साईप्रसादच्या वतीने सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saiprasad Support Corona Infected Patients Nanded News