संकल्प सर्वच करतात, पण पुढे काय होते? ते वाचाच 

प्रमोद चौधरी
Monday, 5 October 2020

संस्काराविना मुलांची वाढ होत असल्याने, त्यांना योग्य दिशा मिळत नसल्याने आजच्या तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यांना गरज आहे योग्य मार्गदर्शनाची. योग्य दिशा दाखविण्याची. 

नांदेड : एखादे कर्म नेहमी करीत राहिल्याने त्याची सवय लागून जाते. जर ते कर्म वाईट असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी दृढ संकल्प असणे गरजेचे आहे. मात्र, सध्या या उलट घडत आहे. प्रत्येकवेळी नववर्षाला किंवा सण-उत्सवाला आपण आपल्यातील वाईट सवयी घालविण्याचा, नष्ट करण्याचा संकल्प करीत असतो. प्रत्यक्षात तसे होतच नाही. उलट आपल्यातील वाईट सवयी वाढतच जातात. याचे कारण आपण या संकल्पाकडे गांभीर्याने बघतच नाही.

कोणतेही काम किंवा कर्म सातत्याने केल्याने त्याची चांगली अथवा वाईट सवय त्या कर्मानुसार मनुष्याला लागते. या सवयीलाच संस्कार असे म्हणतात. मूळ संस्कार, आई-वडिलांकडून किंवा परिवाराकडून आलेले संस्कार, संगतीने मिळालेले संस्कार याचबरोबर काही संस्कार आपल्याला आपल्या पूर्वजन्मापासूनही मिळत असतात. एखाद्या लहान मुलाला तोंडात बोट घालण्याची सवय असली तरी एका विशिष्ट वयोमर्यादेपर्यंत पालक त्याकडे दुर्लक्ष करीत असतात; परंतु ते मूल जसजसे मोठे होत जाते, तेव्हा त्याला सांगावे लागते की ही सवय वाईट आहे. त्यात एकदम बदल होणार नाही. कारण त्याला त्यागोष्टीची खूप प्रमाणात सवय लागलेली असते. हळूहळू ती सवय कमी होत जाऊन ती काही दिवसांनी बंद होते.

हेही वाचा - नांदेड हादरलं: शहरात 3 दुकानांवर गोळीबार, हल्ला करणारे ताब्यात

हल्ली मुलांवर घरातून संस्कार करणे दुरापास्त झाले आहे. विभक्त कुटुंबपद्धती आज समाजात रुढ झालेली आहे. दोघेही पती-पत्नी नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने सकाळीच घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे मुलांना पाळणा घरात सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्येष्ठ माणसाची आज कुटुंबामध्ये अडचण होत आहे. त्याचा परिणाम मुलांच्या संस्कारांवर होताना दिसून येत आहे. बोटांवर मोजण्याइतक्याच शाळांमध्ये मुलांवर सर्वप्रकारचे संस्कार घातले जात आहेत. संस्काराविना मुलांची वाढ होत असल्याने, त्यांना योग्य दिशा मिळत नसल्याने आजच्या तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यांना गरज आहे योग्य मार्गदर्शनाची. योग्य दिशा दाखविण्याची. 

हे देखील वाचाच - नांदेड- जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे तिनतेरा, तरीही श्रेयवादाचे राजकारण संपेना

वाईट सवयींमुळे अडचणी वाढत जातात. ज्याप्रमाणे एखाद्यावर आपण राग काढला की त्या व्यक्तीसोबतचे असणारे संबंध बिघडत जातात. याला बदलावे लागते तर शांतच राहावे लागेल. पंरतु, आपला मूळ स्वभाव शांतच असतो. चांगल्या संस्काराला मन, बुद्धीची गरज नसते. ते आपोआप येत असतात. मूळ संस्कार प्रत्येकातच असतात. परंतु, वाईट गोष्टी सातत्याने करीत राहिल्याने मूळ संस्कार अडगळीत पडल्यासारखे होतात. मग मूळ संस्कार आपल्याकडेच आहेत तर ते शोधायची गरज नाही. गरज असते ती फक्त वाईट सवयी बंद करण्याचा दृढ संकल्प करण्याची. सातत्यपूर्ण प्रयत्नाने आपण ते हळूहळू करू शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sankalpa Does Everything But What Happens Next Nanded News