esakal | चांगली बातमी! पुन्हा वाजणार शाळांची घंटा, शासनाने काढले आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

school

चांगली बातमी! पुन्हा वाजणार शाळांची घंटा, शासनाने काढले आदेश

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड: मागील सव्वा वर्षापासून कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा सुरु करणे शक्य नसल्याने ऑनलाइन अध्यापनासाठी शासनाने परवानगी दिली होती. मात्र, कोरोना नसलेल्या गावात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत बुधवारी (ता. सात) सुधारीत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यातील एकूण एक हजार ६०४ गावांपैकी एक हजार ४५० गावे कोरोनामुक्त झाली आहेत. तर २७६ गावांमध्ये कोरोनाचा शिरकावच झाला नाही. त्यामुळे या गावांत शाळा सुरू करणे शक्य असल्याने स्थानिक प्रशासनाकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. शिक्षण विभागाने विविध माध्यमातून प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोहचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे जिल्ह्यातील तब्बल ७० टक्के विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले. लॉकडाउनमुळे शिक्षणात खंड पडल्यामुळे बालविवाह, बालमजूरी, मुला-मुलींच्या गळतीचे प्रमाण वाढले. मुलांचे अजून शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शासनाने आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग कोरोनामुक्त गावात सुरू करण्याचे जाहीर केले. त्यानुसार जिल्ह्यातील काही गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागाकडून आढवा घेतला जात आहे.

हेही वाचा: भागवत कराड! केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा प्रवास आश्चर्यचकित करणारा

गावपातळीवर समिती
कोविड मुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत पालकांशी चर्चा करुन ठराव करावा. ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या समितीने शाळा सुरु करण्या आधी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शिक्षकांचे लसीकरण करण्याबाबत पाठपुरावा करावा. तसेच विद्यार्थी कोरोनाग्रस्त आढळल्यास तत्काळ शाळा बंद करुन निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करावी, तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार करावेत, अशा सूचना दिल्या आहेत.

शाळांसाठी मार्गदर्शक सूचना
- शाळेमधील वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, डेस्क, टेबल, खुर्च्या, वाहने यांची वारंवार स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी शाळा प्रशासनाची असेल.
- संबंधित शाळेतील शिक्षकांनी गावातच राहावे किंवा येण्या जाण्यासाठी स्वतःच्या वाहनाचा वापर करावा
- रोज दोन सत्रांमध्ये भरणाऱ्या शाळेचे आणि त्यातील वर्गांचे स्वतंत्र आगमन आणि गमन यांचे वेळापत्रक व मार्ग शाळांनी निश्चित करावेत, म्हणजे गर्दी टळेल.

हेही वाचा: सव्वा वर्षात खासदारकी अन् मंत्रिपदही

ही काळजी घ्यावी...
- एका बाकावर एक विद्यार्थी
- दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर
- एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी
- सत्रांच्या वेळा व महत्त्वाच्या विषयांचे आलटून पालटून नियोजन करणे
- सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर, रॅपिड ॲन्टिजेन चाचणी अनिवार्य
- विद्यार्थ्यांची उपस्थिती ऐच्छिक असून ती पूर्णतः पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल

जिल्ह्यातील एकूण गावे - एक हजार ६०४
कोरोनामुक्त गावे - एक हजार ४५०
जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळा - ८०१
जिल्हा परिषदेच्या शाळा - ७०
अनुदानित शाळा - ६१७
विनाअनुदानित शाळा - १८४

loading image