गणेशोत्सवात स्वयंशिस्तीला प्राधान्य द्या- जिल्हाधिकारी डॉ. विपीन 

प्रल्हाद कांबळे
Saturday, 8 August 2020

यावर्षी कोविड -19 या संसर्गजन्य प्रादुर्भावामुळे यावर्षी प्रत्येक नागरिकांनी स्वयंशिस्तीला अधिक प्राधान्य देण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे

नांदेड : आध्यात्मिक उत्साहाला प्रतिबिंबीत करणारा उत्सव म्हणून गणेशोत्वाकडेआपण पाहत जरी असलो, तरी यावर्षी कोविड -19 या संसर्गजन्य प्रादुर्भावामुळे यावर्षीप्रत्येक नागरिकांनी स्वयंशिस्तीला अधिक प्राधान्य देण्यावर भर द्यावा, असे आवाहनजिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. शुक्रवार 7 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक गणेश मंडळ पुर्वनियोजन आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.  

जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रत्येक नागरिकांचे जबाबदार वर्तन अपेक्षित आहे. सार्वजनिक पातळीवर लोकसहभागातून लोकांच्या इच्छेनुसार जी कांही वर्गणी गोळा होईल त्यातील वर्गणीचा कांही भाग हा वैद्यकीय उपकरणांसाठी रुग्णालयांना दिल्यास ती खऱ्या अर्थाने विवेकाचे प्रतिक ठरेल असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील गणेश मंडळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत साधेपणावर भर देवून शासनाने आखून दिलेल्या नियम व अटीच्या चौकटीत हा उत्सव साजरा करतील असा विश्वासही  त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी या गणेशोत्वासाठी खालील अटी व शर्ती निश्चित केल्या आहेत.

यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित

· सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासनाची त्यांचे स्थानिक धोरणानुसार यथोचित पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.

श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता 4 फूट व घरगुती गणपतीसाठी 2 फुटाच्या मर्यादित असावी. यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावे. घरी विसर्जन करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. गणेश मूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास त्या मूर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळी किंवा 2021 च्या भाद्रपद महिन्यात म्हणजेच पुढील वर्षाच्या विसर्जनाच्यावेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरून श्री गणेशाचे आगमन व विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळता येऊ शकते. यामुळे स्वतःचे व कुटुंबियांचे कोरोना साथीच्या रोगांपासून रक्षण होईल.

हेही वाचा -  नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पात झाला एवढा पाणीसाठा

सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरे उदा. रक्तदान शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे

· उत्सवाकरिता देणगी, वर्गणी स्वेच्छेने दिलास त्याचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरे उदा. रक्तदान शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना,मलेरिया, डेंग्यू असे आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय त्याचप्रमाणे स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

·आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनिप्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे.

· श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन केबल नेटवर्क वेबसाईट व फेसबुक इत्यादींद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

· गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण करावे तसेच थर्मल स्क्रीनिंग ची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टेंसिंग) तसेच स्वच्छतेचे नियम मास्क, सॅनिटायझर इत्यादी पाळले जाईल, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

· श्रीच्या आगमन व विसर्जनाची मिरवणूक काढण्यात येऊ नये. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील अथवा इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित काढण्यात येऊ नये.

· महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आदींच्या मदतीने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी.

· कोविड-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्याचे देखील अनुपालन करावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Self-discipline should be given more priority in Ganeshotsav- Collector Dr. Vipin nanded news