नांदेड : चैत्यभूमीला पोस्टकार्डे पाठवून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन 

प्रमोद चौधरी
Saturday, 5 December 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त नांदेड जिल्ह्यातील जवळा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी चैत्यभूमीला पोस्टकार्डे पाठवून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.

नांदेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून बाबासाहेबांना अभिवादन करणारी पत्रे चैत्यभूमीला पाठवली जात आहेत. महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान तसेच दक्षिणेकडील काही राज्यांतून हे अभियान सुरू झाले आहे. याचाच एक भाग म्हणून जवळा देशमुख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पोस्टकार्डे स्वत:च्या अक्षरात लिहून चैत्यभूमी, मुंबईकडे रवाना केली आहेत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे लाखो आंबेडकरी अनुयायी अभिवादनासाठी जमा होतात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमजयंती, बुद्धजयंती, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साधेपणाने आणि घरीच राहून साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच आता राज्यातील लहान मोठ्या शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी होणारी गर्दी पाहता बाबासाहेबांना घरीच राहून अभिवादन करण्यात यावे, असे प्रशासनाने कळवले आहे. त्याला प्रतिसाद देत जवळ्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी बाबासाहेबांप्रति कृतज्ञता आणि अभिवादन व्यक्त करणारी पत्रे लिहून चैत्यभूमी स्मारक, दादर (प)., मुंबई- ४०००२८ या पत्त्यावर पाठवून दिली आहेत. 

हेही वाचा - शाळा सुरु झाल्या, पण...अभ्यासक्रमाचे काय? डॉ. गोविंद नांदेडे

या अनोख्या उपक्रमामध्ये कल्याणी शिखरे, किरण कदम, लक्ष्मण शिखरे, सृष्टी शिखरे, कृष्णा शिखरे, साक्षी गच्चे, अंजली झिंझाडे, अक्षरा शिंदे, अक्षरा शिखरे, शुभांगी गोडबोले, अक्षरा गोडबोले, साक्षी गोडबोले, निशा गोडबोले, मुस्कान पठाण, दीपाली गोडबोले यांच्यासह अनेक मुलामुलींनी सहभाग नोंदवला. 

काय लिहिले आहे पत्रात? 
‘प्रिय बाबासाहेब, तुमच्यामुळे आमची कुळी उद्धारली. शिक्षणामुळे आमचे कल्याण झाले. तुमचाच आदर्श घेऊन मी खूप खूप शिकणार. खूप पुस्तके वाचणार. कोरोनामुळे सहा डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर नतमस्तक होण्यासाठी आम्ही येऊ शकत नाही. तरी माझे शब्दरूपी अभिवादन स्वीकारावे, ही विनंती. जयभीम. ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपणास विनम्र अभिवादन!’ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sending Postcards To Chaityabhoomi Greetings To Dr Babasaheb Nanded News