नांदेडचे ‘धडपड व्यासपीठ' पोरके झाले : डॉ. सुरेश सावंत

प्रमोद चौधरी
Tuesday, 27 October 2020

नांदेड जिल्ह्यात शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक असे भवताल समृद्ध करणारे प्राचार्य ग. पि. मनूरकर होते. त्यांच्या निधनामुळे नांदेडचे धडपड व्यासपीठ पोरके झाले, अशा भावना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी व्यक्त केली.

नांदेड : जवळपास सहा दशकाहून अधिक काळ उमरी परिसरात शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक भवताल समृद्ध करणारे प्राचार्य ग. पि. मनूरकर यांचे मंगळवारी (ता. २७) निधन झाले. मागील तीन वर्षांपासून ते कर्करोगाने आजारी होते. मध्यंतरी ते कोविड पॉझिटिव्ह आले होते. पण त्यांनी कोविडवर देखील मात केली होती.

गुरुवर्य ग. पि. मनूरकर हे एक सर्जनशील शिक्षक होते. आपले विद्यालय हेच आपले तीर्थक्षेत्र, हा त्यांचा संस्कार होता. त्यांनी उमरीच्या यशवंत विद्यालयात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून आपली शाळा तर नावारूपाला आणलीच, शिवाय ‘धडपड व्यासपीठा’च्या माध्यमातून परिसरातील शिक्षकांनाही उपक्रमशील बनविले. शिक्षकांमधील प्रेरणा जागवून उमरी तालुक्याच्या शिक्षणविश्वात चैतन्य निर्माण केले. ते आचार्य परंपरेतील एक निष्णात अध्यापक होते. त्यांनी आपल्या शाळेचा भौतिक आणि गुणात्मक विकास साधला. संस्थेचा शैक्षणिक विस्तार केला. शाळेला व्यापक जनाधार मिळवून दिला.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यातील पंधरा जिल्हा परिषदेच्या शाळा ‘आदर्श’

मराठी भाषेच्या शिक्षकाने केवळ पाठ्यपुस्तक शिकवायचे नसते, तर विद्यार्थ्यांच्या मनात वाङ्मयाची अभिरुची निर्माण करायची असते, हा गुरुजींच्या सर्जनशील अध्यापनाचा कृतिशील संदेश होता. त्यांच्या वर्गात विद्यार्थी म्हणून शिकणे, हा एक समृद्ध करणारा आनंददायी अनुभव होता. गुरुजी हजारो विद्यार्थ्यांचे दैवत होते. खेड्यापाड्यातील कष्टकऱ्यांची मुलेसुद्धा डॉक्टर - इंजिनिअर होऊ शकतात, हा विश्वास त्यांनी निर्माण केला.

हे देखील वाचा - हिंगोली जिल्हा परिषदेने दिली ७८ गुरुजींना समुपदेशनद्वारे पदस्थापना

मुख्याध्यापकाच्या कर्तृत्वाची उंची ही संस्थाचालकांपेक्षा अधिक असते, हे मनूरकर गुरुजींनी आपल्या कार्यातून सिद्ध केले. अनेक झोपड्यांपर्यंत त्यांनी अक्षरांचा उजेड पोहोचविला. उमरीसारख्या ग्रामीण भागात व्याख्यानमाला चालवून त्यांनी जनप्रबोधन केले. त्यांच्या वाणीत आणि लेखणीत अलौकिक लालित्य होते. कविता वाचल्यासारखे ते कथाकथन करायचे आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करायचे. आमच्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी बोलते केले आणि लिहिते केले.

येथेही क्लिक कराच - पोलिस भरतीत भोई, ढीवर जलतरणपटूंना हवे स्थान

गुरुजींच्या अध्यापनाला कधीही चार भिंतींच्या मर्यादा पडल्या नाहीत. त्यांनी आयुष्यभर ग्रामीण माणसांच्या मनाची मशागत केली. शैक्षणिक समर्पणाचं दुसरं नाव म्हणजे ग. पि. मनूरकर! मनूरकर गुरुजी म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ होते! आम्ही ह्या मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत, हे सांगताना आम्हाला अभिमान वाटतो! मनूरकर सरांनी कथा, कविता, कादंबरी आणि वैचारिक लेखनात मौलिक योगदान दिले आहे. मनूरकर गुरुजी म्हणजे गोदाथडीचे वैभव होते. गुरुजींच्या निधनामुळे गोदाकाठचे हे शैक्षणिक आणि साहित्यिक वैभव लोपले आहे. मनूरकर गुरुजींच्या प्रेरणादायी स्मृतींना विनम्र अभिवादन!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior Literary Principal Manurkar Passes Away Nanded News