साडेसात लाख नुकसानग्रस्तांना मदतीची प्रतिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer crop damage

साडेसात लाख नुकसानग्रस्तांना मदतीची प्रतिक्षा

नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे एकूण सात लाख ४१ हजार शेतकऱ्यांच्या पाच लाख २७ हजार हेक्टर क्षेत्रातील खरिपासह बागायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यात बाधितांना एनडीआरएफच्या नव्या निकषानुसार (दुप्पट भरपाई) जिल्हा प्रशासनाने ७१७ कोटी ८८ लाख ९१ हजार सहाशे रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. परंतु शासनाकडून अद्याप भरपाइ मिळाली नसल्याने नुकसानग्रस्त प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यात यंदा जुलै महिन्यात अतिवृष्टी होऊन अनेक मंडळात एकापेक्षा अधिक वेळा अतिवृष्टीची नोंद झाली होती.

जुलैमध्ये तर एका महिन्यात विक्रमी ६०६ मिलीमीटर पाऊस होऊन पिकांची दाणादाण उडाली होती. अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर येऊन नदीकाठची जमिन खरडून गेली. सखल भागातील पिके पाण्याखाली गेली होती. जिल्ह्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीत जिरायतीमधील सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, उडीद, मुग या पाच लाख २७ हजार १४१ हेक्टरवरील जिरायती पिकांसह ३१४ हेक्टरवरील बागायती व ६६ हेक्टरवरिल फळपिके असे एकूण पाच लाख २७ हजार ४९१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधीक नुकसान झाले होते. यात सात लाख ४१ हजार ९४६ शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफच्या नव्या निकषानुसार (दुप्पट भरपाई) जिल्ह्यासाठी ७१७ कोटी ८८ लाख ९१ हजार सहाशे रुपयांची मागणी राज्य शासनानकडे केली आहे. परंतु शासनाकडून निधी मिळाला नसल्यामुळे लाखो नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.

तालुकानिहाय मागणी केलेला निधी

नांदेड - २५,८९,५२,२००, अर्धापूर - २९,१६,५२,०००, कंधार - ५५,१२,६०,०००, लोहा - ६१,०५,०४,०००, देगलूर - ४२,९५,०४,८००, मुखेड - ५४,७०,१९,२००, बिलोली - ४०,३५,३९,२००, नायगाव - ४१,०५,४७,०००, धर्माबाद - २९,५३,९८,८००, उमरी - ४०,११,३२,०००, भोकर - ५२,४३,०७,२००, मुदखेड - २४,२७,०५,६००, हदगाव - ८५,२०,२८,०००, हिमायतनगर - ४२,७४,०७,२००, किनवट - ६७,०९,१५,२००, माहूर - २२,२०,१९,२००. एकूण - ७१७,८८,९१,६००