जयंती विशेष: शरद जोशी यांचे विचार शेतकऱ्यांना नेहमीच ऊर्जा देणारे- डाॅ. श्याम तेलंग

प्रल्हाद कांबळे
Thursday, 3 September 2020

देशातील चुकीच्या शासकीय धोरणात आणि शेतीमालाला मिळणाऱ्या अत्यल्प भावात आहे हे मत संपूर्ण अभ्यासाअंती ठासून मांडणारे,स्वातंत्र्यानंतर सर्वात जास्त लोकसहभाग असलेली विधायक चळवळ उभी करणारे कृतीशील विचारवंत,थोर अर्थतज्ञ आदरणीय शरद जोशी यांचा जन्म 3 सप्टेंबर 1935 रोजी सातारा येथे झाला

नांदेड : केवळ शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे नाही तर भारतातील एकूण गरिबीचेच मूळ आपल्या देशातील चुकीच्या शासकीय धोरणात आणि शेतीमालाला मिळणाऱ्या अत्यल्प भावात आहे हे मत संपूर्ण अभ्यासाअंती ठासून मांडणारे,स्वातंत्र्यानंतर सर्वात जास्त लोकसहभाग असलेली विधायक चळवळ उभी करणारे कृतीशील विचारवंत,थोर अर्थतज्ञ आदरणीय शरद जोशी यांचा जन्म 3 सप्टेंबर 1935 रोजी सातारा येथे झाला.

वडील पोस्ट खात्यात कारकुन तर आई अशिक्षित गृहिणी. आश्चर्याची बाब अशी की पुढे देशातील शेतकऱयांचे प्रश्न समजून घेऊन ,त्यावर अभ्यास करून,त्यावर उपाय सुचवणारा  वस्तुनिष्ठ अहवाल केंद्र सरकारला सादर करणारे,शेतकऱ्यांनी पंचप्राण म्हणून स्वीकारलेले शेतकरी  नेते शरद जोशी यांना वडिलोपार्जित अशी एक एकरही जमीन नव्हती.भारतातील शेतकरी बहुतांशी अशिक्षित,ग्रामीणभागात विखुरलेला,वेगवेगळ्या जाती धर्माचे रिवाज पाळणारा,अनेकविध राजकीय पक्षांच्या जोखडात अडकलेला,अनेक कालबाह्य अंधश्रद्धा मनोभावे जपनारा.त्यांना एकत्र आणणे,त्यांची एक सुसूत्र संघटनास्थापन करणे हे काम सोप्पे मुळीच नव्हते.वास्तविक पाहता त्यांना घराण्याचे,जातीचे,राजकीय किंवा आर्थिक असे कुठलेच पाठबळ नव्हते.पण स्वच्छ विचाराची आणि प्रामाणिक ध्येय ठेवून केलेल्या कामाची ताकत किती प्रचंड असू शकते याचे ते ज्वलंत उदाहरण होते.

त्यांचेी राहणीमान अत्यंत साधी होती

खरेतर वयाची चाळीशी होईपर्यंत शरद जोशी आणि शेती किंवा शेतकरी यांचा दुरान्वयानेही संबंध नव्हता.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीचे दहा वर्षे त्यांनी भारतातील पोस्ट खात्यात वर्ग एक अधिकारी म्हणून उत्तम कार्य केले.नंतर स्वित्झर्लंड सारख्या प्रगत देशात ऐन उमेदीतील आठ वर्षे घालवली.खरे तर तेथे यु एन या आंतरराष्ट्रीय संस्थेत मोठ्या पगारावरील वरीष्ठ पदावर काम करत ते एक सूखवस्तू कौटुंबिक जीवन जगत होते.त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबातील,स्वकर्तुत्वाने ते मोठे अधिकारी झाले तरीही त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते.तथापी त्यांनी गरिबीचे उदात्तीकरण कधी केले नाही.स्वित्झर्लंडमध्ये असताना त्यांना मानवी जीवनात आर्थिक समृद्धीचे असलेले अनेक पदरी महत्व निश्चित जाणवले.  तेथिल कौटुंबिक आणि सामाजिक समृद्धीमागे अनेक घटक असले तरी शेतीतील समृद्धी हा अत्यंत महत्त्वाचा घटकआहे यात शंका नाही.तेथील समृद्धीच्या ,विकासाच्या मुळाशी शेती आहे याची समाजाला आणि शासनाला स्पष्ट जाणीव असल्यामुळे तेथील सरकार शेतीला सर्व प्रकारे उत्तेजन देते. समृद्ध शेतीवरच त्यांनी देशाचा औधोगिक विकास केला.पण औद्योगिकरण करताना शेती कडे दुर्लक्ष होऊ दिले नाही.

स्वित्झर्लंडमधील अधिकारीपदाचा राजीनामा

स्वित्झर्लंडमधील अधिकारीपदाचा राजीनामा देऊन शरद जोशी भारतात सहकुटुंब परतले ते एक मे एकोणीसशे शहात्तर रोजी.कुटुंब,नातेवाईक आणि मिञमंडळी यांचा काही प्रमाणात असलेला विरोध न जुमानता त्यांनी प्रयोगासाठी म्हणून शेती घ्यावयाचे ठरवले.पुणे जिल्हा खेड तालुक्यातील आंबेठाण या छोट्याशा खेड्यात त्यांनी एक जानेवारी एकोणीसशे सत्त्याहत्तर रोजी पंचवीस एकर कोरडवाहू जमीन खरेदी केली.आणि त्याचे सार्थ नाव ठेवले..'अंगारमळा '

पुण्यापासून साधारण चाळीस किमी अंतरावर.

 मुलींच्या शिक्षणासाठी घर कुटुंब पुणे तर कर्मभूमी शेती आंबेठाण या खेड्यात.असा त्यांचा अनोखा जीवन प्रवास सुरु झाला.इथे आल्यानंतर साहजिकच त्यांना स्वित्झर्लंड आणि भारत यातील प्रचंड तफावत जाणवत होती.त्यांनी आणखी एक निरीक्षण केले.ते म्हणजे पुणे शहर आणि आंबेठाण गाव येथील नागरिकांचे राहणीमान आणि आर्थिक स्थिती यात असलेला फरक.एकाच देशातील अवघ्या चाळीस किमी अंतरावर असलेल्या नागरिकांमध्ये अविश्वासनिय फरक होता.राष्ट्रध्वज एक,राष्ट्रपती एक,राष्ट्रगीत एक,वरवरच्या सगळ्या खुणा एकच आहेत.पण आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या या देशाचे दोन भाग पडले आहेत.एवढेच नाही तर यातील एक भाग हा दुसऱ्या भागाचे शोषण करतोय.एक भाग म्हणजे इंडिया-हा सत्तर वर्षीपूर्वी स्वतंत्र झाला आणि दुसरा भाग म्हणजे भारत-येथील रहिवाश्यांनी आणखी स्वातंत्र्याची चवच चाखली नाही .ते स्वतः सुखासीन इंडिया आणि दरिद्री भारत एकाच वेळी अनुभवत होते.स्वित्झर्लंड आणि आपला देश यातील फरकापेक्षाही ही इंडिया आणि भारत यातील भीषण दरी त्यांना अस्वस्थ करत होती.

गरिबीचे मूळ शेतीमालाला मिळणाऱ्या अल्प भावातच

खेड्यात काही दिवस राहून,स्वतः शेती करून,अभ्यास आणि चिंतन करून त्यांना हा फरक का आहे याचे  कारणही माहिती झाले होते.ते कारण आहे शेतकऱ्यांची नुकसनीतील शेती.देश्याच्या आणि व्यक्तीच्या जीवनात आर्थिक समृद्धी महत्वाची आहे आणि देश समृद्ध करायचा असेल तर शेतीला प्राथमिकता देणे आवश्यकआहे हे त्यांचे मत आणखी पक्के बनले.केवळ शेतकऱयांच्या दारिद्र्याचेच नाही तर देशातील एकूणच गरिबीचे मूळ शेतीमालाला मिळणाऱ्या अल्प भावातच आहे हे एव्हाना त्यांच्यातील अर्थशास्त्रज्ञाला उमगले होते.येथील शेतमजुरांच्या श्रमाचे मोल आणि कारखान्यातील मजुरांच्या श्रमाचे मोल,तसेच शेतीमाल आणि औधोगिक माल यांच्या किमतीतील फरक अचंबित करणारा आहे हे ते उघड्या डोळ्यांनी पाहत होते.

मागणी वाढवून भावही वाढवणार.भारत सरकार नेमके उलट धोरण राबवते

दुसरी एक महत्वाची बाब त्यांच्या निदर्शनास आणि शेतकरी म्हणून अनुभवास आली होती ती म्हणजे शेती आणि शेतकरी यांच्यावर असलेली सरकारी बंधने.त्यामुळे एक बाजूला होणारा प्रचंड भ्रष्टाचार आणि दुसऱ्या बाजूने होणारे शेतकऱयांचे नुकसान.उद्योग व्यापारी यांच्यावर असलेल्या सरकारी बंधनांची सामान्य माणसाला बरीच माहितीअसते. त्याहून कितीतरीअधिक जाचक बंधने आपल्या शेतकऱ्यांना आहेत याची जाणीव समाजाला नाही की खुद्द शेतकरी यावर कधी चर्चा करत नाही.त्यांनी पाहिलं की येथील सरकार -सत्ताधारी कुणीही असो-शेतकऱयांचे सरकार म्हणवून घेते मात्र संपूर्ण धोरणे शेतकरी हिताच्या विरोधात राबवते.शेतकऱयांचे खरे हित पाहणारे,शेतीला उत्तेजन देणारे स्वित्झर्लंड देशाचे सरकार  त्यांनी पाहिले होते.एखादेवेळी एखाद्या शेतीमालाचे भाव पडले तर सरकार स्वतः खरेदी करणार आणि मागणी वाढवून भावही वाढवणार.भारत सरकार नेमके उलट धोरण राबवते हे त्यांच्या सारख्या चाणाक्ष बुद्धीच्या अर्थतज्ज्ञांच्या नजरेतून सुटणे शक्य नव्हते.शेतीमालाच्या आयातनिर्यात विषयीचे चुकीचे धोरण हे येथील शेतकरी दुर्बल करणारे प्रमुख कारण आहे हे त्यांनी लगेच ओळखले.एका निष्णात डॉक्टरने आजाराचे अचूक निदान केले.

शब्दांकन- डॉ. श्याम बापुराव तेलंग, नांदेड

      


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Joshi's thoughts always give energy to farmers Dr. Shyam Telang nande news