धक्कादायक : नांदेड जिल्ह्यातील ‘हा’ पाझर तलाव फुटून शेकडो हेक्टर शेती गेली खरडून

file photo
file photo

मुक्रमाबाद (जिल्हा नांदेड) : गेल्या आठ- दहा दिवसांपासून पावसाने मोठा कहर माजविला असून दिवस- राञ मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मुखेड तालुक्यातील बेन्नाळ येथील पाझर तलाव हा बुधवार (ता. १६) पहाटेच्या सुमारास फुटला. यामुळे शेकडो हेक्टर शेती खरडून गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम पाण्यात वाहून गेला. 

बेन्नाळ येथील नागरिकांची व शेतीच्या पाण्याची कायमची समस्या सुटावी यासाठी शासनाने मोठा गाजावाजा करत   १९७२ मध्ये येथे पाझर तलावाची निर्मिती केली. पण निर्मिती केल्यापासून संबंधित प्रशासनाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी या तलावाकडे फिरकला नाही. की, त्याची एकदाही डागडूजी करण्यात आली नसल्यामुळे हा  तलाव अनेक लहान मोठ्या झाडा- झुडपांनी व्यापलेला होता. या झाडांच्या मुळा या तलावाच्या खोलवर रुतल्यामुळे तलावाची तटभिंत ही अतिशय कमकुवत झाली होती. त्यात दहा दिवसापासून परीसारात सतत मुसळधार पाऊस होत असल्यामुळे हा तलाव पुर्णपणे भरला होता. पाण्याचा दाब वाढल्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास हा तलाव फुटून जवळपास दिडशे हेक्टर असलेले सोयाबीन, ज्वारी, उडीद, तुर यासह इतर पीके वाहून गेली.

तलाव फुटीमुळे सर्वच पिके वाहून गेली

शेतातील पीके वाहून जाऊन त्याठिकाणी तलावातील मोठे दगड. मुरूम येऊन बसले असून चांगल्या शेतीला माळरानाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शेतीच्या मधोमध मोठ्या प्रमाणात पाणी वाहून त्याठिकाणी मोठे कालवे तयार  झाले आहेत. शेतकऱ्यांनी या लॉकडाऊनमध्ये पोटाला पीळ मारून शेतातील सर्व पीके जगविली होती. चांगल्या पावसामुळे पिके चांगली तरारली होती. पण या तलाव फुटीमुळे सर्वच पिके वाहून जाऊन होत्याचे नव्हते झाल्यामुळे सरकारने शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी

येथील तलावाची निर्मिती झाल्यापासून तलाव कोणत्या परिस्थितीत आहे. डागडूजी करावी लागते का? यासाठी प्रशासनातील कोणताही अधिकारी व कर्मचारी हे गेल्या ५२ वर्षापासून एकदाही फिरकले नाहीत. म्हणूनच आज हा तलाव फूटून दिडशे हेक्टरवर असलेले पीक वाहून गेले. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने तात्काळ शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.
- श्रीकांत काळे, सरपंच, बेन्नाळ
 

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com