धक्कादायक - नांदेडला एकाचा मृत्यू तर सहा पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

नांदेडसाठी गुरूवारचा (ता. २१ मे) चा दिवस धक्कादायक ठरला. दिवसभरात सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यापैकी एका रुग्णाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. तसेच मुखेड आणि बिलोली तालुक्यातही रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

नांदेड - नांदेडसाठी गुरूवारचा (ता. २१ मे) चा दिवस धक्कादायक ठरला. दिवसभरात सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यापैकी एका रुग्णाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. तसेच मुखेड आणि बिलोली तालुक्यातही रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनासह नांदेड शहर आणि ग्रामिण भागातही आरोग्य यंत्रणेला आणखी सतर्क रहावे लागणार आहे. 

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नांदेडला गुरूवारी (ता. २१) रात्री साडेआठ वाजता आलेल्या अहवालात एकूण सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सहा पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दोन जण शहरातील गाडीपुरा लोहारगल्ली भागातील, एक जण यात्री निवास येथे दाखल झाला आहे. तर अन्य दोन जण रावणकुळा (ता. मुखेड) येथील रहिवासी तर एक जण केरुर (ता. बिलोली) येथील रहिवासी आहे.

हेही वाचा - ‘ध’ चा ‘मा’ झाल्यामुळे नांदेडकर बुचकळ्यात, जबाबदारी कोणाची?

उपचारादरम्यान एकाचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार लोहारगल्ली गाडीपुरा भागातील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. रावणकुळा (ता. मुखेड) येथील दोन रुग्णांना मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात तर केरूर (ता. बिलोली) येथील एका रुग्णास बिलोलीच्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

पाच जणांचे अहवाल निगेटिव्ह
दरम्यान, विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय, बारड (ग्रामीण) कोविड केअर सेंटर व यात्री निवास एनआरआय कोविड सेंटर येथे उपचार सुरु असलेल्यांपैकी पाच पॉझिटिव्ह रुग्णांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने गुरुवारी (ता.२१) त्या सर्वांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. तसेच हिंगोली जिल्ह्यातील पाच जण गुरुवारी कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचलेच पाहिजे - मोफत तूरडाळ, चनाडाळीचे वितरण सुरु

६७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आत्तापर्यंत नांदेड जिल्ह्यातील आत्तापर्यंत ११६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४१ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले तर ६७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सहा झाली आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह असलेले दोन रुग्ण अजूनही फरारच असून त्यांच्याविरुद्ध वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध पोलिसांच्या वतीने घेण्यात येत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking - Nanded has one death and six positives, Nanded news