श्री राम मंदिर निर्माण निधी संकलनास नांदेडमध्ये उत्साहात व रॅलीने सुरवात

प्रल्हाद कांबळे
Saturday, 16 January 2021

नांदेड शहरात या अभियानाचा प्रारंभ शुक्रवार (ता. १५) जानेवारी रोजी मोठ्या जल्लोषात करण्यात आला. नांदेड शहरात विविध १६  ठिकाणी अभियान प्रारंभ दिनाचा कार्यक्रम घेऊन या अभियानाचा श्रीगणेशा करण्यात आला

नांदेड : श्री राम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासा तर्फे सर्व भारतभर ता. १५ जानेवारी ते ता. १५ फेब्रुवारी या काळात भव्य राम मंदिर निर्माणासाठी निधी संकलन केल्या जाणार असून नांदेड शहरात या अभियानाचा प्रारंभ शुक्रवार (ता. १५) जानेवारी रोजी मोठ्या जल्लोषात करण्यात आला. नांदेड शहरात विविध १६  ठिकाणी अभियान प्रारंभ दिनाचा कार्यक्रम घेऊन या अभियानाचा श्रीगणेशा करण्यात आला. शहराचा मुख्य कार्यक्रम हनुमानपेठ ( वजिराबाद ) येथील पंचवटी हनुमान मंदिरात या अभियानाचे नांदेड जिल्हाचे अध्यक्ष  श. ब्र. १०८ डॉ. विरुपाक्ष स्वामी महाराजांच्या उपस्थतीत पार पडला. या कार्यक्रमास समितीचे उपाध्यक्ष सु. ग. चव्हाण, जिल्हा संघचालक डॉ. सुधीर कोकरे, शहर संघचालक डॉ. गोपाळ राठी, आनंदबन महाराज कोलंबीकर, सुभाष कन्नावार, रविकिरण डोईफोडे व अनेक संत उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात विकास परदेशी यांनी सांघिक गीताने केली त्यानंतर मान्यवर उपस्थितांनी श्री रामाच्या प्रतिमेचं पूजन केले. जिल्हा कार्यवाह राजू सोनटक्के यांच्या  प्रास्ताविकानंतर उपस्थित संतांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्यातील ५१ कारसेवांचा सत्कार करण्यात आला  व ' असं साकारतंय राम मंदिर ' या सांस्कृतिक वार्तापत्राचं  विमोचन देखील करण्यात आलं. संत आशीर्वचनात श. ब्र. १०८ डॉ. विरुपाक्ष स्वामी महाराज यांनी सर्व समाजाने प्रभू श्री राम चंद्राच्या आदर्श व त्यागमय जीवनाचा अंगीकार करावा तसेच समुद्रावर सेतू बांधण्याचं अशक्यप्राय काम वानरसेना अन खारीच्या मदतीने जस शक्य झालं. तसच भव्य राममंदिर निर्माणासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने खारीचा वाटा उचलावा अस आवाहन केलं. 

तदनंतर पंचवटी हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली. कार्यक्रमात शेवटी महावीर चौक ते पोलिस अधीक्षक कार्यालय व परत महावीर चौक अशी रॅली काढण्यात आली. त्यात हजारो रामभक्तांनी सहभाग नोंदविला. ठिकठिकाणी या रॅलीवर पुष्पवृष्टी व भव्य स्वागत करण्यात आले. या अभियानाचे सोशल माधयमावर प्रक्षेपण केल्यामुळे हजारो रामभक्तांनी हा सोहळा पहिला. शुभारंभाच्या दिवशी १०० रुपयापासून ते एक लाख ५१ हजारापर्यन्त विविध रामभक्तानी समर्पण केले. या भव्य शुभारंभ कार्यक्रमामुळे सर्व समाजात चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे. ज्या रामसेवकांना या समर्पण अभियानात काम करावयाचे आहे. त्यांनी सन्मान प्रेस्टिज दुसरा मजला येथे अभियान संपर्क कार्यालयात आपले नाव नोंदवावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shri Ram Mandir Nirman Fundraising begins with enthusiasm and rally in Nanded