esakal | कोरोनाच्या सावटामुळे यंदाही फुलवळची श्रीक्षेत्र महादेव यात्रा रद्द

बोलून बातमी शोधा

महादेव मंदीर फुलवळ

कोरोनाच्या सावटामुळे यंदाही फुलवळची श्रीक्षेत्र महादेव यात्रा रद्द

sakal_logo
By
धोंडिबा बोरगावे

फुलवळ (जिल्हा नांदेड) : कंधार तालुक्यातील फुलवळ येथील जाज्वल देवस्थान म्हणून सर्वदूर परिचित असलेल्या श्रीक्षेत्र महादेव देवस्थान येथे दरवर्षी आमली बारसनिमित्त सलग पाच दिवसाची खूप मोठी यात्रा भरत असते. माळेगाव यात्रेनंतरची या भागातली दुसऱ्या क्रमांकाची यात्रा म्हणून नावारुपाला आली होती. परंतु गेल्या वर्षीपासून सर्वत्र कोरोनाने हाहाकार घातला असल्यामुळे आणि शासनाने बरेच काही निर्बंध घातले असल्याने गेले वर्षी आणि आता यावर्षी ही सदर यात्रा रद्द करण्याचा निर्णय गावकरी व ग्राम पंचायतने घेतला असल्याने दरवर्षी विविध दुकाने व भक्तगणामुळे भरभरुन दिसणाऱ्या महादेव मंदिराकडे आजघडीला शुकशुकाट असल्याचे दिसून येते.

गावापासून पश्चिमेला काही अंतरावर असलेल्या महादेव मंदिराची खूप मोठी जुनी आख्यायिका असून हे जाज्वल देवस्थान म्हणून सर्वदूर परिचित असल्याने आणि नवसाला पावणारा देव म्हणून सुप्रसिद्ध असल्यामुळे तेथे महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणाहून तर भाविक दर्शनासाठी येतातच परंतु आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातूनही बहुतांश ठिकाणाहून भाविक दर्शनासाठी येथे येत असतात.

हेही वाचा - विशेष स्टोरी : रमजानमध्ये खजूर खाऊनच का सोडतात रोजा?

आमली बारसनिमित्त गावातुन काठ्या, कावडची मिरवणूक काढून वाजतगाजत ते महादेव मंदिरात नेऊन ठेवल्या जातात, सलग पाच दिवस महादेवाचा सकाळ, संध्याकाळ अभिषेक केला जातो. सलग पाच दिवस पारणे ( उपवास ) धरले जातात. काठ्या, कावडीसोबत काटकर ही पाच दिवस मंदिरातच ठाण मांडून असतात आणि एकादशीच्या दिवशी शिवमहादेव- पार्वतीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होतो. बारशीनिमित्त कुस्त्यांच्या दंगली, पशुप्रदर्शन, विविध स्टोल उभारले जातात. दुवादशीच्या दिवशी आंबील, भाजी- भाकरीच्या पंगतीचे सामुदायिक आयोजनही केले जाते. परंतु गेली दोन वर्षा पासून या कोरोना महामारीमुळे यात्राच भरवायची नाही असा निर्णय ग्रामस्थानी घेतल्यामुळे यंदाही यात्रा रद्द करण्यात आली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे