एकाच कुटुंबातील तब्बल सहा सदस्य मुके; बोलता येत नाही मात्र त्यांचा संवाद पाहून...

लक्ष्मीकांत मुळे
Monday, 5 April 2021

या कुटुंबात एक नाही, दोन तर तब्बल सहा सदस्य मुके आहे. विशेष म्हणजे दोन पिढीत मुके जन्माला आले आले आहेत. या कुटुंबात संवाद साधला जातो तो सांकेतिक भाषेतून.

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : भाषा हे संवादाचे साधन. आपण आपला राग, जिव्हाळा, प्रेम, सुख, दु: ख सर्व प्रकारच्या भाव- भावना आपण भाषेव्दारे व्यक्त करतो. पण ज्या कुटुंबात तब्बल सहा सदस्य मुके असतील तर .. आशा कुटुंबात सांकेतिक भाषेत आपला दैनंदिन व्यवहार करावा लागतो. शहरातील नवी आबादी परिसरात राहणाऱ्या नक्कलवाड कुटुंबातील कथा काही न्यारीच आहे. या कुटुंबात एक नाही, दोन तर तब्बल सहा सदस्य मुके आहे. विशेष म्हणजे दोन पिढीत मुके जन्माला आले आले आहेत. या कुटुंबात संवाद साधला जातो तो सांकेतिक भाषेतून.

'मुकं करोती वाचलम'  पंगू लंघयती गिरी ...असा एक संस्कृतमध्ये श्लोक आहे. याचा अर्थ असा होतो की, मुका बोलू शकतो, तर लंगडा पर्वत चढू शकतो. जन्मापासुन भटके जीवन जगणाऱ्या नक्कलवाड कुटुंबावर ना भगवंताची कृपा झाली ना मायबाप सरकारची. शहरातील रामचंद्र नक्कलवाड हे मुळचे मुदखेड येथील. नंदीबैल सजवून गोवोगावी जावून लोकांचे कोडे सोडणे, धान्य, कपडे जमा करणे आदी मार्गाने उदरनिर्वाह चालवत.

हेही वाचा - नांदेड : दोषींवर कडक कारवाई करा पण निरपराध्यांना त्रास देवू नका; काँग्रेसची मागणी

भटकंती करुन जीवन जगणाऱ्यांचे ठराविक असे गाव, स्वत: चे घर, शेती असे काही नसते. ज्या गावात सहारा मिळाला तेच गाव व तिथेच वस्ती होत आसते. असेच रामचंद्र नक्कलवाड कामाच्या शोधात अर्धापूरला आले. त्यांना पाच मुली, पाच मुलं त्यापैकी दोन मुलं व एक मुलगी मुकी आहेत. यांचा सांभाळ करत मोठे केले. यातील दोन मुक्या मुलांचेही ईतर भावंडाप्रमाणे विवाह झाले आहे. साऱ्या कुटुंबाचा व्यवसाय म्हणजे भटकंती करुन छोट्या मोठ्या वस्तू विकणे, भंगार जमा करणे हा आहे. आपल्या कुटुंबात दुसऱ्या पिढीला तरी मुकेपणाचा वारसा मिळू नये असे रामचंद्र नक्कलवाड यांना वाटत होते. यांची प्रकाश, सुभाष, अनिता ही तीन आपत्य मुकी आहेत.

कुटुंबात मुकी अपत्य जन्माला येणे हे अनुवंशीक नसले तरी या कुटुंबात दुसऱ्या पिढीतही मुकी अपत्य जन्माला आली आहेत. या कुटंबातील सुभाष नक्कलवाड यांना चार मुलं आहेत. त्यापैकी अजय (वय 26) , व्यंकट (वय 13), रितेश (वय नऊ) ही मुकी आहेत. विशेष म्हणजे जी अपत्य या कुटुंबात मुकी आहेत ती बहिरीसुध्दा आहेत.

आमचे कुटुंब भटके असून गावोगावी जावून नंदीबैलाचे खेळ दाखवून, भविष्य सांगून उदरनिर्वाह करीत होतो. पण सध्या नंदीबैल सांभळणे आवघड झाले आहे. भंगार गोळा करुन, छोट्या मोठ्या वस्तू विकून आमच्या कुटुंबाचा गाडा पुढे ओढण्यात येत आहे. आमच्या कुटुंबात सहा मुके असून सांकेतिक  भाषणे संवाद साधला जातो आसे रामचंद्र नक्कलवाड यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Silent six members of the same family; Can't speak but seeing their dialogue nanded news