वा रे पठ्ठ्या... : पोलिसांनाच मारहाण करुन हुज्जत;  तेलंगणातील सहा जणांना अटक

file photo
file photo

मरखेल (जिल्हा नांदेड) : मष्णेर तीर्थक्षेत्र (ता. देगलूर) येथे दारु पिऊन बाजारात धुडघुस घालत व्यापाऱ्यांच्या साहित्याची नासधूस करणाऱ्या मद्यपी लोकांना समजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मरखेल ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालून त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा लोकांविरुद्ध मरखेल पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ही घटना मंगळवारी (ता. २६) रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. उपरोक्त सहा आरोपींना मरखेल पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील किरण प्रभाकर भोडके, मारोती केरबा शिंदे, रमेश कामाजी मुंडकर, सुभाष गंगाराम जाधव, श्रीकांत सत्यनारायण गायकवाड सर्व रा. निझामाबाद व विजय मारोती नामेवार रा. डोंगळी मंडळ मदनूर (तेलंगणा) हे मष्णेर येथे देवदर्शनासाठी आले होते. यातील काही जण मद्यपान करुन बाजारात धुडघुस घालत होते. उपरोक्त लोकांनी बाजारातील बांगडी व्यापाऱ्याच्या बांगड्यांची नासधूस केली. सदरची माहिती मरखेल पोलिसांना कळताच पोलिस कर्मचारी विष्णुकांत चामलवाड हे घटनास्थळी पोहचले. मद्यपी लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना या लोकांनी तू कुठला पोलिस म्हणून त्याच्याशी हुज्जत घालून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती लक्षात घेता मरखेल ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अजित बिरादार, हवालदार प्रभाकर गुडमलवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मष्णेर गाठून तेलंगनातील लोकांना ताब्यात घेतले. 

गेल्या काही दिवसांपासून जागृत देवस्थान असलेल्या मष्णेर येथे मद्यपी लोकांचा वावर वाढला असून, बहुतांश मंगळवारी मारहाणीचे प्रकार घडत आहेत. परिणामी येथे येणारे भाविक व व्यापारी यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होत चालली आहे. दर मंगळवारी याठिकाणी सीमावर्ती भागातील कर्नाटक, आंध्र, तेलंगणा राज्यासह महाराष्ट्रातील विविध भागातून मोठ्या प्रमाणावर भावीक दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने येत असतात. नवविवाहित जोडप्यांची याठिकाणी मोठी गर्दी असते. याशिवाय सदरचे देवस्थान हे प्रशासनाच्या अखत्यारीत नसल्याने भाविकांना वेगवेगळ्या समस्या सोसाव्या लागतात. शिवाय या परिसरात वैध व अवैधरित्या सहजपणे दारु उपलब्ध असल्याने याठिकाणी मद्यपी लोकांची संख्या वाढणे साहजिकच आहे. यामुळे या देवस्थानाची दूरवर असलेली ख्याती या कारणांमुळे वेगळ्या चर्चेतून जात असताना दिसते आहे. 

मरखेल पोलिसांचे तुलनेने असलेले कमी संख्याबळ याठिकाणी पहारा देण्यास कमी पडत असल्याचे सांगितले जात आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरवदे, मरखेल ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. पोलिस कर्मचारी विष्णुकांत चामलवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मरखेल पोलिसांनी धुडगूस घालून पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या या सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सूर्यतळ करत आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com