विजेच्या कडाकडाटाने उडाली झोप, कुठे ते वाचा...

राजन मंगरुळकर 
Sunday, 10 May 2020

नांदेड जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटे अवेळी पावसाने जोरदार हजेरी लावली. एरव्ही अवेळी येणारा पाऊस कधी पडून गेला ते कळतसुध्दा नाही. मात्र, शनिवारी मध्यरात्री झालेल्या नांदेडकरांना झोप लागण्यापुर्वीच पावसासोबत मोठ्या आवाजातील विजांचा कडकडाटाने अनेकांची झोप उडाली. आपल्या आजुबाजुच्या परिसरात कुठे वीज पडली असावी, या प्रश्‍नानेच पहाटेपर्यंत नागरिक जागे होते. 

नांदेड ः शहरासह जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून अवेळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांची झोप उडविली आहे. यातच शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटे अवेळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शनिवारी मध्यरात्री नांदेडकरांना झोप लागण्यापुर्वीच पावसासोबत मोठ्या आवाजातील विजांचा कडकडाटाने अनेकांची झोप उडाली. आपल्या आजुबाजुच्या परिसरात कुठे वीज पडली असावी, या प्रश्‍नानेच पहाटेपर्यंत नागरिक जागे होते. यासोबतच महावितरणने वीजपुरवठा खंडीत केल्याने घरात उकाडा, बाहेर जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडाट असा अवेळी पावसाचा अनूभव नांदेडकरांना आला. जिल्ह्यात कोठे वीज पडली हे मात्र, दुपारपर्यंत कळू शकले नव्हते.   

जिल्ह्यातील वाई बाजार येथे पहाटे मेघगर्जनेसह हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला तर कुरुळा परिसरात पहाटे चारच्या सुमारास मेघगर्जनेसह अर्धा तास तर नायगाव परिसरात वादळी वाऱ्यासह साधारण पाऊस झाला. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. तर मारतळ्यासह परिसरात रात्री वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मुखेड शहर व परिसरात पहाटे चारच्या सुमारास मेघगर्जनेसह अर्धा तास पाऊस झाला. सलग तीन दिवसापासून बिगर मोसमी (अवेळी) पावसाचा कहर झाला असून सरासरी ९.७७ मिलीमीटर पावसाची नोंद सकाळपर्यंत झाली आहे. 

हेही वाचा - औरंगाबाद @५४६ चौदा दिवसात ४९३ रुग्ण! आज ३८ पॉझिटिव्ह 

मुक्रमाबादसह परिसराला बसला अवकाळीचा तडाखा
मुक्रमाबाद ः अचानक वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात या बेमोसमी मुसळधार पावसाने मुक्रमाबादसह परिसराला अक्षरशः झोडपून काढल्यामुळे शेतीसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वीज पडून एक म्हैस दगावली आहे. बेमोसमी अवकाळी पाऊस व गारपीटीने  मुक्रमाबादसह परिसराला जवळपास दोन तास चांगलेच झोडपून काढले. काकडी, टरबूज, टमाटे, ज्वारी यासह इतर पिके शेतातच उभी होती. या बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांची ही पिके जमिनदोस्त झाल्यामुळे सर्वच पिके हिरावून नेली असल्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटच्या खाईत सापडला  आहे.

हेही वाचा - परभणीला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा

अनेक मोठी झाडे उन्मळून पडली
वादळी पावसामुळे शेतात असलेली आंबा, लिंबाची झाडे यासह महामार्गावर असलेली अनेक मोठी झाडे उन्मळून पडली. मुक्रमाबादपासून जवळच असलेल्या मारजवाडी येथील जिल्हा परिषद   शाळेवरील टिनपत्रे उडून दूर जाऊन पडली आहेत. सावरमाळ येथील एका घरावर विज पडली. पण या घरातील व कुटुंबातील व्यक्तींना काहीच जीवितहानी झाली नाही हे विशेष. तर परिसरातील अनेक गाव, वाडी, ताड्यांवर विद्यूत पुरवठा करणारे खांब वाकली. या वादळी पावसात वळंकी येथील बाबूराव बिरादार यांची म्हैसही शेतातच बांधून होती. या वेळी अचानक वीज पडून ही म्हैस दगावली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sleep Deprived By Lightning, Read Where nanded news