esakal | बनावट वन मजूर दाखवून बँक खात्यातून केली रक्कम हडप; भोकर तालुक्यातील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

भोकर तालुक्यातील प्रकार, दोघांविरुध्द गुन्हा दाखल

बनावट वन मजूर दाखवून बँक खात्यातून केली रक्कम हडप; भोकर तालुक्यातील घटना

sakal_logo
By
बाबूराव पाटील

भोकर ( जिल्हा नांदेड ) : चिदगिरी (ता. भोकर ) येथील काही गरीब मजुरांची नावं शासकीय कामावर दाखवून त्यांच्या नावे बँकेत बनावट खाते काढून पैसे उचलून परस्पर हडप करणाऱ्या चीदगिरी (ता. भोकर) येथील दोघांविरुद्ध सोमवारी (ता. एक) भोकर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

भोकर तालुक्यातील चीदगिरी येथील साहेब नारायण वाघमारे ( वय 42) शेतमजूर यांचे नावे देना बँकेत खाते असल्याने काही व्यवहारासाठी त्यांनी मुदखेड येथे नेट बँकिंगद्वारे व्यवहार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिथे असे लक्षात आले की त्यांचे नावे आयडीएफसी बँकेमध्ये खाते आहे. अधिक चौकशी केली असता असे आढळून आले की, गावातील रमेश गुलाब चव्हाण यांनी कुठलीही माहिती न देता आयडीएफसी बँकेत खाते क्रमांक 10010411506 या क्रमांकाचे खाते उघडून रोहयो व वन विभागाचे कामावर काम केल्याचे दाखवले व प्रत्यक्षात कुठलेही काम त्यांनी केले नव्हते. 65 हजार 117 रुपये त्या खात्यातून उचलण्यात आले. गावातील इतर मजूर लोकांचेसुद्धा खाते बँकेमध्ये अशाच प्रकारे उघडण्यात आलेले आहेत. हा कारभार करण्यासाठी रोजगार सेवक मनोज रघुनाथ चव्हाण यांनीही सहकार्य केल्यावरुन भोकर पोलिसात साहेब वाघमारे यांच्या फिर्यादीवरुन रमेश गुलाब चव्हाण व मनोज रघुनाथ चव्हाण यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक विकास पाटील करत असून अद्याप एकाही आरोपीला अटक झाली नसल्याचे सांगण्यात आले.

सखोल चौकशी गरजेची आहे

भोकर तालुक्यातील काही मजूर हिंगोली जिल्ह्यातील रोहयो कामावर वनविभागाच्या कामावर लावण्यात आले असल्याचा प्रकार काही महिन्यापूर्वी उघडकीस आला होता. याप्रकरणी काही आरोपींना भोकर येथे आणले होते. नांदेड येथील एटीएममधून पैसे उचलताना काही आरोपींना नांदेडमधून अटक करण्यात आली होती. भोकर येथील काही संशयित गुन्हेगार यांचाही समावेश होता. आता चीतगिरी येथील मजुरांच्या नावे वन विभाग व कामावर बोगस मजूर दाखवून रक्कम हडप केली. 

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image