स्नेहनगर पोलीस वसाहतीचा विकास करणार- आ. कल्याणकर

प्रल्हाद कांबळे
Tuesday, 5 May 2020

नांदेड (उत्तर) चे आमदार बालाजी कल्याणकर यांनी सोमवारी (ता. चार) मे रोजी शहराच्या स्नेहनगर परिसरातील पोलिस वसाहतीला भेट दिली. आणि तेथील पोलिस कर्मचारी व पोलिस कुटुंबियांशी चर्चा करुन आपल्या वसाहत विकासासाठी मी कटीब्ध्द असल्याचे त्यांना सांगितले. तसेच पाण्याची समस्या तात्काळ सोडविणार.

नांदेड : शहरातील मध्यभागी असलेल्या स्नेहनगर पोलीस वसाहतीत अनेक समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी आमदार बालाजी कल्याणकर यांनी पोलिस वसाहतीची पाहणी करून समस्या सोडविणार आल्याचे पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

कोणत्याही संकटात धावून येणाऱ्या पोलिसांच्या शासकीय घरांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यांच्याकडे आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांनी लक्ष दिलेले नाही. स्नेहनगर पोलीस वसाहतीत अनेक समस्या आहेत. पाण्याची मुख्य समस्या असून आजही ही चार दिवसाआड पाणी मिळते. त्याबरोबरच ड्रेनेजची ही मुख्य समस्या आहे. जागोजागी घाण पाणी साचत आहे. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. वसाहतीतील ३० टक्के घरे ही जुनी झाली असून ती मोडकळीस आली आहेत. या इमारतीपासून जीवितास धोका निर्माण झाला आहे. या बाबी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या कानावर येताच त्यांनी तात्काळ पोलिस वसाहतीची पाहणी केली.

हेही वाचाखास खादीप्रेमींसाठी अल्पदरात ‘खादी’ मास्कची निर्मिती कुठे ते वाचा

स्नेहनगर पोलिस वसाहतीची पाहणी

स्नेहनगर पोलीस वसाहतीचे इन्चार्ज यांना सोबत घेऊन पाण्याच्या समस्येची पाहणी केली. पाण्याची समस्या पुढील दोन दिवसात सोडू असे आश्वासन दिले. या समस्या दूर करण्यासाठी संबंधित विभागाला सूचनाही दिल्या आहेत. मोडकळीस आलेल्या घरांचा प्रस्ताव सादर करा त्यावर विधानसभेत आवाज उठविणार असल्याचेही आश्वासन आमदार कल्याणकर यांनी दिले. लवकरच ड्रेनेजची समस्या सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

आपल्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करीन 

आमदार बालाजी कल्याणकर सकाळी पोलिस वसाहतीत पाहणी करत असल्याचे पाहून पोलीस कुटुंबही आश्चर्यचकित झाले. आजपर्यंत अशाप्रकारे कुणीही पोलिस वसाहतीत येऊन पोलिसांना आश्वासित केले नाही. त्यामुळे पोलिसांनी आ. कल्याणकर यांच्यासमोर अनेक समस्या मांडल्या. त्या समस्या लवकरात लवकर सोडविणार असल्याचे आश्वासन यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांनी पोलिस कटुंबियांना दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Snehnagar Police will develop the colony mla Kalyankar nanded news