esakal | टाळेबंदीत काही सुखद: सोनाली- गंगाधरच्या रेशीमगाठीसाठी अख्खे गावकरी सरसावले

बोलून बातमी शोधा

विवाहसोहळा
टाळेबंदीत काही सुखद: सोनाली- गंगाधरच्या रेशीमगाठीसाठी अख्खे गावकरी सरसावले
sakal_logo
By
अनिल कदम

देगलूर ( जिल्हा नांदेड ) : प्रत्येकाच्या आयुष्यात "लग्न" संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व असते. ज्याच्या त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार विवाहसोहळा करण्याची प्रथा समाजात रुढ आहे. मात्र काहींच्या नशिबात ही घटिका पार पाडण्यासाठी अनेक अग्निदिव्यातून जावे लागते. पै- पै जमा करुनच माता- पित्यांना कन्यादानासारखे दिव्य कार्य पार पाडावे लागते. जेथे खाण्याची भ्रांत आहे, तिथे असे समारंभ कुटुंबप्रमुखासमोर एक "संकट" म्हणून उभी असतात. मात्र जिथे "अवघे धरू सुपंथ" या न्यायाने गावकरी "दातृत्व" स्वीकारायला पुढे येतात आणि तेथे हे मंगलकार्य विधिवत पद्धतीने पार पाडले जाते. शेवटी "लेक चालली सासरला" ही धून वाजवित गावकऱ्यावर सासुरवाशिणीला निरोप देण्याची वेळ येते तेव्हा कुटुंबप्रमुखासह गावकऱ्यांनी ही अश्रूंना वाट मोकळी करुन दिल्याशिवाय राहावले नाही. असाच काहीसा प्रकार देगलुर तालुक्यातील कावळगाव येथे सोनाली- गंगाधर या नव दांपत्याच्या गुरुवारी (ता. २२) पार पडलेल्या विवाह समारंभादरम्यान पुढे आला.

कोरोनामुळे हवालदिल व बेरोजगार झालेल्या या काळात तालुक्यातील कावळगावच्या ग्रामस्थांनी रोजंदारी करणाऱ्या व पोटी असलेल्या तिनही कन्या असलेल्या एका गरीब कुटुंबातील एका मुलीचे लग्न गावकऱ्यांच्या दातृत्वातून लावून दिले. कोरोनाचे सर्व नियम पाळून पार पडलेल्या या आगळ्यावेगळ्या विवाहाची गावकऱ्यांच्या दातृत्वाची सध्या तालुक्यात चर्चा होताना दिसत आहे.

हेही वाचा - खबरदारी घेऊ, कोरोनावर मात करु- डॉ. प्रदीप आवटे

कावळगाव येथील नरसिंग फूगेवार हे मोलमजुरी करुन आपलया कुटुंबाची उपजीविका भागवत असत. कोरोनाच्या या काळात टाळेबंदीमुळे रोजगार उपलब्ध नसल्याने उपासमार होत असताना लग्नसमारंभासारखा विषय तरी कसा पार पडायचा या विवंचनेत फुगेवार कुटुंबीय होते. श्री. फुगेवार यांच्या सोनाली या दुसऱ्या मुलीचे वागदरी (तालुका गंगाखेड) येथील ज्ञानोबा हैदरवार यांच्या गंगाधर या मुलासोबत लग्न ठरले. मात्र लग्न करुन द्यावे अशी आर्थिक परिस्थिती नसल्याने श्री. फुगेवार कुटुंब चिंतेत होते. ही बाब गावकऱ्यांना समजताच सगळे ग्रामस्थ एकत्र आले व मनाचा मोठेपणा दाखवत सर्वांनी आपापल्या परीने मदत जमा केली. आणि मुलाकडील मंडळीना गुरुवारी (ता. 22 ) एप्रिल रोजी बोलावून घेऊन पाहुण्यांचे आदरातिथ्य करत विधिवत पद्धतीने मुलीचे कन्यादान केले. कोरोनाच्या या संकटकाळात गावकऱ्यांनी उचललेले पाऊल सामाजिक दृष्ट्या सुखद देणारे ठरले असून या लग्न समारंभाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

संसारोपयोगी साहित्याहीला दिला हातभार...!!

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सोनालीचे कन्यादान करण्याचा योग गावकऱ्यांना मिळाला तरी काहींनी आपल्या परीने जे संसारोपयोगी वस्तू असेल ती देण्याचाही प्रयत्न याप्रसंगी केला. त्यामुळे सोनालीच्या नव्या वाटचालीसाठी मोठा हातभार लागला आहे. याप्रसंगी देणाऱ्यांचे हात अदृश्य असले तरी या घटनेतून कावळगाववासीयांनी समाजासमोर नवा आदर्श घालून दिला आहे .

संपादन- प्रल्हाद कांबळे