esakal | लसीकरणासाठी भूमिपुत्र तालुका वैद्यकीय अधिकारी मूळगावी मुक्कामी
sakal

बोलून बातमी शोधा

तामसा परिसरात लसीकरणाला वेग

लसीकरणासाठी भूमिपुत्र तालुका वैद्यकीय अधिकारी मूळगावी मुक्कामी

sakal_logo
By
शशिकांत धानोरकर

तामसा ( जिल्हा नांदेड ) : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याबाबत ग्रामीण भागात असलेले गैरसमज व भीती यामुळे लसीकरण मोहीम अत्यल्प प्रतिसाद मिळत असून डाक्याचीवाडी (ता. हदगाव) या जंगल व आदिवासीबहुल गावात भूमिपुत्र असलेले किनवट येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी मुक्कामी राहून लस घेण्याबाबत केलेल्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम दिसत आहे.

डॉक्टर मुरमुरे हे शुक्रवारी ( ता. ११) गावी मुक्कामाला होते. रात्रीच्या वेळी कुटुंबीय व गावातील नातेवाईकांकडे कोरोना महामारीबाबत त्यांनी चर्चा करून लसीबाबत माहिती विचारली. त्यावेळी लस घेण्याबाबत असलेली भीती व गैरसमजुतीचा फटका म्हणून लस घेण्याच्या मोहिमेला प्रतिसाद नसल्याचे धक्कादायक वास्तव स्पष्ट झाले. विशेष म्हणजे डॉ. मुरमुरे यांच्या गावातील कुटुंबातच ४५ वर्षावरील व्यक्तींनी कोरोनाची लस घेतली नव्हती. त्यांचे वडीलही याबाबत अपवाद नव्हते. त्यामुळे रात्रीच्या मुक्कामात उशिरापर्यंत व दुसरे दिवशी सकाळी डॉ. मुरमुरे यांनी स्वतःचे घर व डाक्याचीवाडी येथील बहुतेक प्रत्येक कुटुंबाशी भेट देऊन संपर्क केला.

हेही वाचा - काँग्रेसचा विरोध, तर राष्ट्रवादीच्या आमदारांचं समर्थन

कोरोना महामारीची धास्ती घेऊन प्रतिबंधात्मक लस टोचणीबाबत असणारे गैरसमज व भीती याबद्दल मार्गदर्शन व समुपदेशन केले. या महामारीपासून वाचण्याचा एकमेव उपाय कोरोना प्रतिबंधात्मक लस असून अफवांमुळे लस घेण्याचे टाळणे चुकीचे व महागात पडू शकते, असा विश्वास ग्रामस्थांमध्ये निर्माण केला. अनेकांनी लस घेण्यानंतर ताप येते अशी चुकीची शंका बोलून दाखविली. त्यावर डॉ मुरमुरे यांनी हे खोटे असून ताप येणे फारसे चिंताजनक नसल्याचे पटवून दिले. शनिवारी (ता. १२) गावात तामसा पीएचसीच्या माळेगाव उपकेंद्राचे डाक्याचीवाडी येथे लसीकरण कार्यक्रम ठेवण्यात आला. डॉ. मुरमुरे यांनी स्वतः च्या वयोवृद्ध वडिलांचे लसीकरण करुन घेतले. त्यानंतर गावातील ४५ वयावरील अंदाजे २५ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली. डॉ. मुरमुरे यांच्या मार्गदर्शनाचा चांगला परिणाम ग्रामस्थांच्या मानसिकतेत झाल्याचे स्पष्ट झाले.

उर्वरित पात्र लाभार्थ्यांनी कोरोंना प्रतिबंधात्मक लस घेण्याचे आवाहन डॉ. मुरमुरे यांनी केली असून याबाबत लसीकरण अभियान गावात पूर्ण होईपर्यंत सतत संपर्क ठेवण्याचे स्पष्ट केले. यावेळी समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश डोंगरे, आरोग्य कर्मचारी कावेरी समृत,अंगणवाडी कर्मचारी रुक्मिणी वानोळे,पार्वती गारोळे,आशावर्कर धुरपता खोकले उपस्थित होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपक कदम, तामसा पीएचसीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास बोंदरवाड यांनी डॉ. मुरमुरे यांच्या कर्तव्यरुपी सहकार्याबद्दल आभार मानून माळेगाव उपकेंद्र अंतर्गत असलेल्या आदिवासीबहुल सर्व गावातील पात्र लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याचे आवाहन केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image