
नांदेड : साडेचार लाख हेक्टरवर सोयाबीन प्रस्तावित
नांदेड - खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ होऊन तब्बल चार लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी प्रस्तावित केली आहे. तर कपाशीच्या क्षेत्रात मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. या सोबतच तूर, मूग, उडीद, ज्वारी या पिकाच्या क्षेत्रातही वाढ अपेक्षित आहे. जिल्ह्यात एकूण साडेसात लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
जिल्ह्यात मागील काही वर्षापासून सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ होत आहे. चालू वर्षी मिळालेला सोयाबीनला दर तसेच त्यानंतर घेण्यात येणार्या पिकाचे उत्पादन चांगल्या प्रकारे येत असल्यामुळे शेतकरी सोयाबीन पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. मागील तीन वर्षाच्या सरासरी पेरणी क्षेत्राच्या तुलनेत आगामी खरीप हंगामात सोयाबीनच्या पेर्यात तब्बल ४० हजार हेक्टरने वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कपाशी मात्र दोन लाख सहा हजार २२५ हेक्टरवरुन एक लाख ६५ हजार हेक्टरवर लागवड होईल, अशी शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. खरीप हंगाम २०२१ मध्ये जिल्ह्यात सात लाख ५६ हजार ६४४ हेक्टरवर पेरणी झाली होती.
यात चार लाख ३४ हजार ९७२ हेक्टरवर सोयाबीन, एक लाख ७५ हजार ४४५ हेक्टरवर कापूस, ७१ हजार ७३१ हेक्टरमध्ये तूर, २३ हजार ८४५ हेक्टरवर मूग, २५ हजार ४२८ हेक्टरवर उडीद, २२ हजार ९५१ हेक्टरवर खरीप ज्वारी, सात हजार ५६६ हेक्टरवर इतर पिके घेण्यात आली होती.
साडेसात लाख हेक्टरवर पेरणी अपेक्षित
कृषी विभागाने २०२२ मध्ये खरीप हंगामातील प्रस्तावित क्षेत्र नुकतेच कृषी आयुक्तालयाला सादर केले आहे. यात पेरणी क्षेत्रात वाढ होऊन एकूण सात लाख ५६ हजार २०० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यात सर्वाधिक सोयाबीन चार लाख ४० हजार हेक्टरवर पेरणी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. या सोबतच कपाशी एक ६५ हजार हेक्टर, तूर ७५ हजार हेक्टर, उडीद ३० हजार हेक्टर, ज्वारी २० हजार हेक्टर, मुग २५ हजार हेक्टर असे क्षेत्र प्रस्तावित केले आहे.
Web Title: Soyabin Proposed On Four And Half Lakh Hector Nanded
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..