esakal | सोयाबीन बियाणे दरवर्षी बदलण्याची गरज नाही- कृषी विभागाचे शेतकर्‍यांना आवाहन

बोलून बातमी शोधा

soyabin
सोयाबीन बियाणे दरवर्षी बदलण्याची गरज नाही- कृषी विभागाचे शेतकर्‍यांना आवाहन
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सोयाबीन पीक हे स्वपरागसिचिंत आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत, त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन वर्षांपर्यंत वापरता येते असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव तसेच जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक बी. बी. गिरी यांनी शेतकर्‍यांना केले आहे.

यंदा सोयाबीनचे दर वाढल्यामुळे बियाणांचे दरही वाढीव राहणार आहेत. यामुळे कृषी विभागाकडून शेतकर्‍यांना सोयाबीन बियाणासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे. शेतकर्‍याने स्वतःकडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी येईल. मागील दोन वर्षात शेतकर्‍यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यापासून उत्पादित आलेले सोयाबीन बियाणे चालू वर्षी बियाणे म्हणून पेरणीसाठी वापरता येईल. तसेच ग्राम बीजोत्पादन पीक प्रात्यक्षिके योजना अंतर्गत

हेही वाचा - नांदेड : मांजरम परिसरात अवकाळी पाऊस; विज पडून म्हैस व वासरु ठार

आलेल्या उत्पादनातून बियाणांची निवड करता येते. प्रमाणित बियाण्यापासून आलेल्या उत्पादनातून चाळणी करून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनचे बियाणे म्हणून निवड करावी. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते. त्यामुळे त्याची उगवण क्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळतांना काळजी घ्यावी.

बियाणाची साठवणूक करताना आद्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. साठवणुकीसाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये. बियाणे साठवताना त्याची थप्पी सात फुटांपेक्षा जास्त होत राहणार नाही याची काळजी घ्यावी. बियाणांची जास्त प्रमाणात आदळाआपट होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रति हेक्टरी बियाणे दर ७५ किलो वरून ५० ते ५५ किलो वर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा प्लॅटर वापरून पेरणी करावी. सोयाबीनची उगवण क्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे. ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. बियाणाची पेरणी तीन ते चार सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी दोनशे ते अडीचशे ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे नंतर पेरणी करावी, असे आवाहनही रवीकुमार सुखदेव तसेच बी. बी. गिरी यांनी केले आहे.