SSC Exam 2023 : दहावीची लेखी परीक्षा उद्यापासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SSC Exam 2023 from tomorrow 160 centers 45468 students exam 100 percent copy free campaign implemented education

SSC Exam 2023 : दहावीची लेखी परीक्षा उद्यापासून

नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची लेखी परीक्षा गुरुवारपासून (ता. दोन मार्च) घेण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यात १६० केंद्रांवर ४५ हजार ४६८ विद्यार्थी परीक्षा देणार असून यंदा जिल्ह्यात शंभर टक्के कॉपीमुक्ती अभियान राबविण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या अभ्यासाचे मूल्यांकन करण्यासाठी परीक्षा घेतली जाते. परंतु, अधिकचे गुण मिळविण्यासाठी विद्यार्थी कॉपीच्या मागे लागतात. वास्तविक पाहता विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असतो, परंतु, पालक तसेच आजुबाजुला होत असलेल्या चर्चांमुळे विद्यार्थी गोंधळून जातात. आजचे विद्यार्थी हे उद्याचे देशाचे भविष्य आहेत.

त्यासाठी कर्तृत्वाने गुण मिळवून त्यांनी यश संपादन करावे, यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये यंदा शंभर टक्के कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असून, यात कुठलीही कसर असणार नाही, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी सांगितले.

परीक्षा तणावमुक्त व कॉपीमुक्तीच्या वातावरणात व्हावी, यासाठी परीक्षा केंद्रांवर महसूल प्रशासन, ग्रामविकास, पोलिस व शिक्षण विभाग, स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. यंदा विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना परीक्षा केंद्रावर मोबाईल आणण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहण्याचे आवाहनही शिक्षण विभागातर्फे केले आहे.

ऐनवेळी परीक्षा केंद्रांत बदल

दहावीची लेखी परीक्षा दोन मार्चपासून सुरु होत आहे. मात्र, विद्यार्थी संख्या जास्त झाल्याने ऐनवेळी परीक्षा केंद्रांमध्ये बदल केला आहे. पीपल्स हायस्कूलमध्ये परीक्षा केंद्र आलेल्या एल ०३८३४८ ते एल ०३८४७२ या बैठक क्रमांक असलेल्या १२५ परीक्षार्थ्यांची केंब्रीज विद्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच माधवराव पाटील माध्यमिक शाळा, राजगडनगर येथे उर्दू, इंग्रजी व मराठी माध्यमांच्या मुलांसाठी राजगडनगरमधील कमला नेहरु कन्या शाळेमध्ये आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

तालुकानिहाय आकडेवारी

तालुका - विद्यार्थी संख्या - केंद्र

नांदेड - १२११२ - ३८

अर्धापूर - १६५८ - सात

भोकर - १७४३ - सहा

बिलोली - १९७१ - सात

देगलूर - २४०१ - दहा

धर्माबाद - १०३९ - तीन

तालुका - विद्यार्थी संख्या - केंद्र

हदगाव - २७३९ - आठ

हिमायतनगर - १९२८ - चार

कंधार - ४००६ - १५

मुखेड - ३५७२ - १४

किनवट - २४५२ - ११

लोहा - २७६७ - १२

तालुका - विद्यार्थी संख्या - केंद्र

माहूर - ११३१ - चार

मुदखेड - १५१८ - सात

नायगाव - ३११७ - ११

उमरी - १३१४ - तीन

एकूण - ४५४६८ - १६०