esakal | दुबार पेरणीसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोफत खते, बियाणे द्यावे - खासदार चिखलीकर
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड - खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना भेटून निवेदन दिले.

नांदेड जिल्ह्यात दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोफत खते व बियाणे द्यावे, अशी मागणी भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना भेटून एका निवेदनाद्वारे केली आहे.

दुबार पेरणीसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोफत खते, बियाणे द्यावे - खासदार चिखलीकर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड - बनावट बियाणे विक्रेते आणि कारखानदार यांच्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी राज्य सरकारने मोफत खते व बियाणे पुरवठा करावा, अशी मागणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या वर्षीच्या खरीप हंगामाच्या पेरण्यांना जोरदार सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात खरीप पेरण्या मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या. या वर्षी पावसाळा वेळेवर सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी आर्थिक संकटावर मात करत बी बियाणे खरेदी केले. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाची उगवण झाली नाही. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील सोयाबीनचे पीक उगवले नसल्याने सदरील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. शिवाय त्यांच्यासमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. 

हेही वाचा - सोयाबीन बियाणे तक्रारीबाबत जिल्हाधिकारी बांधावर....कुठे ते वाचा 
 

शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट 
बनावटी बियाणे तयार करणाऱ्या आणि उगवण क्षमता यांची हमी देणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यापूर्वीच करण्यात आली होती. परंतु अद्यापपर्यंत सदरील कंपन्या आणि बियाणे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही. तर दुसरीकडे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने त्वरित मदतीचा हात देत दुबार पेरणीसाठी आवश्यक असणारे संपूर्ण खते आणि बियाणे मोफत पुरवठा करावीत अशी मागणी खासदार चिखलीकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य सरकारकडे केली आहे.

दुकाने आणि कारखान्यांचे परवाने रद्द करा
दरम्यान, राज्य सरकारने ज्या कंपन्यांनी बनावटी बियाणे तयार केले आणि ज्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना बनावटी बियाणे विक्री केले. अशा कारखानदार, व्यापाऱ्यांवर त्वरीत गुन्हे दाखल करावेत. त्यांच्या दुकानांचे आणि कारखान्याचे परवाने रद्द करावेत, अशी मागणीही खासदार चिखलीकर यांनी केली आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - गोदावरीचे पावित्र्य राखा, अन्यथा गय नाही...असा इशारा कोणी दिला? वाचा...

राज्यातील शेतकरी हवालदिल
शेतकरी आर्थिक संकटात असताना राज्य सरकार मात्र शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत करत नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात दुबार पेरणीचे संकट त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा मानसिकरीत्या खचत असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत राज्य सरकारने विनाविलंब दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना तत्काळ मोफत खते आणि बियाणे उपलब्ध करावेत असा पुनरुच्चारही खासदार चिखलीकर यांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.  

 

loading image
go to top