Video- स्वारातीम विद्यापीठामध्ये राज्यव्यापी बेमुदत ठिय्या आंदोलन

श्याम जाधव
Thursday, 24 September 2020

महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीतर्फे  गुरुवार ता.२४  पासून पूकारण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनामध्ये एकजुटीने सहभागी होऊन विद्यापीठाचे १०० टक्के कामकाज थांबविले आहे.

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी यांनी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीतर्फे  गुरुवार ता.२४  पासून पूकारण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनामध्ये एकजुटीने सहभागी होऊन विद्यापीठाचे १०० टक्के कामकाज थांबविले आहे. सेवक संयुक्त कृती समितीने सातवा वेतन आयोग, आश्वासित प्रगती योजना, पाच दिवसाचा आठवडा आणि इत्तर प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आलेले आहे.

सातवा वेतन आयोग लागू करणे, आश्वासित प्रगती योजना आणि पाच दिवसाचा आठवडा लागू करणे यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी लेखणीबंद / अवजारबंद आंदोलन पुकारलेले आहे. एकीकडे विद्यापीठांमध्ये परीक्षा घेण्याची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. यामुळे शासनावर आणि विद्यापीठ प्रशासनावर दबाव निर्माण होत आहे.

हेही वाचानांदेड : दुथडी वाहणाऱ्या गोदावरीत युवकाचा मृत्यू -

नाईलाजास्तव परीक्षेच्या काळात कर्मचाऱ्यांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले

महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होऊन जवळपास पाच वर्षे होत आहे. पण अकृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्याप लागू केलेला नाही. महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ, मागासवर्गीय कर्मचारी महासंघ आणि अधिकारी फोरम राज्यस्तरावर गेली पाच वर्षापासून पाठपुरावा करत आहे. पण शासनाने याची दखल घेतली नाही, त्यामुळे नाईलाजास्तव परीक्षेच्या काळात कर्मचाऱ्यांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले आहे.

सर्व प्राध्यापकांनी आंदोलनास पाठिंबा

या आंदोलनास स्वारातीम विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य परमेश्वर हसबे, डॉ.वैजयंता पाटील, डॉ.महेश मगर, डॉ.रमाकांत घाडगे, डॉ.दीपक बच्चेवार, डॉ.अशोक टिपरसे आदींनी पाठिंबा दर्शविला आहे. याव्यतिरिक्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरातील सर्व प्राध्यापकांनी आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

येथे क्लिक करा - नांदेड ः सर्वाधिक प्रवासी कर भरणाऱ्या ‘एसटी’ची झोळी रिकामीच

आंदोलनास मोठे स्वरुप प्राप्त

या राज्यव्यापी आंदोलनामध्ये महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र विद्यापीठ अधिकारी फोरम, महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ, शासकीय अनुदानित महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी कृती समिती, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ आदी संघटनांनी सहभाग असल्यामुळे आंदोलनास मोठे स्वरुप प्राप्त झाले आहे.

विद्यापीठाचे कामकाज पूर्णपणे ठप्प

या आंदोलनामुळे विद्यापीठाचे कामकाज पूर्णपणे ठप्प पडले आहे. त्यामुळे विद्यापीठांमध्ये काम घेऊन येणाऱ्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांची कामे प्रलंबित होतील, अशी दिलगिरी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी कृती समितीच्या वतीने व्यक्त केली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Statewide indefinite sit-in movement at Srtm University nanded news