esakal | निर्दोष शीख बांधवांची धरपकड थांबवा- शिवसेनेची पोलिस उपमहानिरीक्षकांकडे मागणी

बोलून बातमी शोधा

file photo

त्यामुळे पोलिस प्रशासनाने दोषींवर जरुर कारवाई करावी; मात्र निर्दोषांची होत असलेली फरफट थांबवावी

निर्दोष शीख बांधवांची धरपकड थांबवा- शिवसेनेची पोलिस उपमहानिरीक्षकांकडे मागणी

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : होळीच्या दिवशी हल्ला- महल्ला कार्यक्रमात झालेल्या गोंधळानंतर पोलिस प्रशासनाकडून शीख समाजातील नागरिकांची धरपकड सुरु असून, यात निर्दोषांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने दोषींवर जरुर कारवाई करावी; मात्र निर्दोषांची होत असलेली फरफट थांबवावी, अशी मागणी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने पोलिस उपमहानिरीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

रंगपंचमीच्या दिवशी शीख समाजाचा परंपरेनुसार हल्ला- महल्ला हा धार्मिक कार्यक्रम असतो. परंतु यावर्षी कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता हल्ला-महल्ला या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतरही हल्ला महल्ला कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी गोंधळ उडाला होता. यात काही पोलिस कर्मचारी जखमी झाले. वास्तविक पाहता पोलिस प्रशासनावर झालेला हल्ला हा निंदनीय व निषेधार्ह आहे. परंतु झालेल्या हल्ल्यानंतर पोलिस प्रशासनाने शीख बांधवांची जी धरपकड सुरु केली त्या धरपकडीत चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार सुरु आहे.

हेही वाचा मुलगी बोहल्यावर चढण्याआधी वडिलांचा मृत्यू; माहूर तालुक्यातील हरडफ येथील हृदय हेलावणारी घटना

त्यामुळे विशेष पोलिस उपमहानिरीक्षकांनी या प्रकरणात स्वतः लक्ष देऊन घटनास्थळावर दाखल नसलेल्या, त्यांचा या घटनेशी संबंध नाही अशा शीख बांधवांची धरपकड थांबवावी, त्यांच्यावर दाखल होत असलेले गुन्हे थांबवावेत. मात्र दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

शिष्टमंडळात आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंदराव पाटील बोंढारकर, उमेश मुंडे, शहरप्रमुख सचिन किसवे, शहरप्रमुख तुलजेश यादव, दर्शनसिंघ सिद्धू आदी उपस्थित होते.