नांदेड जिल्ह्यातील शासकीय आरोग्यसेवा बळकट करा- डावी आघाडी व नागरी विकास समितीची मागणी

प्रल्हाद कांबळे
Monday, 27 July 2020

नांदेड जिल्हा डावी लोकशाही आघाडी व नागरी विकास समितीच्या वतीने पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांना देण्यात आलेल्या वेगवेगळ्या निवेदनाद्वारे करण्यात आली.

नांदेड : कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम करून तिचा सर्वत्र विस्तार करावा अशी मागणी नांदेड जिल्हा डावी लोकशाही आघाडी व नागरी विकास समितीच्या वतीने पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांना देण्यात आलेल्या वेगवेगळ्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे मागील पंधरा दिवसात कोरोनाच्या रुग्णांत आणि मृत्यूतही लक्षणीय वाढ झाली आहे. ही    बाब चिंताजनक असून शासनाने जिल्ह्यातील आरोग्य सेवा सक्षम करुन तिचा गाव आणि विभाग पातळीवर विस्तार करावा. शासकीय दवाखाने, जिल्हा   परिषदेचे आरोग्य सेवा, महानगरपालिकेचे रुग्णालय सर्व प्रकारांनी सक्षम करावे. वेळ पडल्यास शासकीय आरोग्य सेवेत खाजगी डॉक्टरांना योग्य तो मोबदला देऊन त्यांची आरोग्य सेवा शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयात उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा Good news : आता कोरोना चाचणी लवकर होणार, मिळाल्या पाच हजार अॅन्टीजेन रॅपिडटेस्ट कीट

शहरातील आदी रुग्णालयात कोरोना तपासणी सेवा सुरु करा

याशिवाय शहरातील शासकीय रुग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, आयुर्वेद रुग्णालय, महापालिकेचे विविध प्रभागांत असलेले रुग्णालयात तपासणी केंद्र चालू करावेत. महात्मा फुले जन आरोग्य सेवा अंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये उपचार केंद्र सुरू करावे. कोरोनासोबतच शहरात सध्या डेंग्यू,मलेरिया सारखे साथीचे आजार झपाट्याने वाढत आहेत. महापालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदेमार्फत विविध भागांमध्ये जंतुनाशक औषधे व फॉगिंग सेवा तात्काळ सुरू करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहेत.

निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या

या निवेदनावर डावी आघाडीचे अध्यक्ष तथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अॅड. कॉ. प्रदीप नागापूरकर, माकपाचे विजय गाभणे, जनता दल सेक्युलरचे जिल्हाध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, शिवाजी फुले, सूर्यकांत वाणी, गंगाधर गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. तर नागरी विकास समितीच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनावर माजी खासदार डाॅ. व्यंकटेश काब्दे, प्रा. लक्ष्मण शिंदे, के. के. जामकर, अॅड. धोंडीबा पवार, अल्ताफ हुसेनी, हरीश ठक्कर, वंदना गुंजकर, गजानन जोशी, प्रा. बालाजी कोम्पलवार, पुष्‍पा कोकीळ, डाॅ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार, सुरेश चाकोते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strengthen government health services in Nanded district - Left Front and Demand of Urban Development Committee nanded news