विद्यार्थ्यांच्या घरभाड्याचा पालकांना आर्थिक फटका! - कसा तो वाचा

नवनाथ येवले
Sunday, 14 June 2020

लाॅकडाउनमुळे खोलीवर न राहताही भाडे भरावे लागते. त्यामुळे भाडेकरुंसह घरमालक व गृह विभागाने दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

नांदेड : कोरोनाचे संकट दूर करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने देशात ता. २४ मार्चपासून लॉकडाउन सुरु केला. त्यामुळे बाजारपेठा या बरोबरच विविध नामांकीत कोचिंग क्लासेस बंद झाल्याने सद्यस्थितीत भाड्याच्या घरात न राहताही तीन महिन्यांचे भाडे द्यावे लागत असल्याने पालकांना मोठा आर्थिक फटका बसत असून भाडेकरुंसह घरमालक आणि गृह विभागाने दिलासा देण्याची गरज आहे.

ग्रामीण भागात शिक्षणाच्या पाहिजे तशा सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने तसेच नामांकीत शाळा, ट्युशन क्लासेस ही शहरात असल्याने आपसूकच   शिक्षणासाठी अनेक कुटुंबे शहराकडे स्थलांतर करतात व आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी वसतीगृह किंवा एखादी खोली भाड्याने घेऊन तिथे एखादी महिला व आपली मुले भाड्याच्या घरात ठेवतात. त्यातच दहावीमध्ये असणाऱ्या पाल्यांबरोबरच विशेष करुन बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या पाल्यांचे हे वर्ष टर्निंग पाॅईंट आहे. 

हे ही वाचा -  कोरोना योद्ध्यांसाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चा पुढाकार

त्यामुळे ज्या पालकांनी आपली पाल्ये ही जेईई, नीटव्दारे इंजिनिअर, डॉक्टर  होण्याचे स्वप्न पाहिले ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी पालक पाल्यांना आपले  गाव सोडून शहर सोडून पुणे, नागपूर, अकोला, नांदेड व लातूर अशा महानगरांमधील शैक्षणिक हब असलेल्या नामांकीत व महागडी क्लासेस लावण्याबरोबरच अनेक कॉमन रूम, वसतीगृहात राहत तर अनेक पालक आपल्या पाल्यांना शैक्षणिक वातावरण मिळावे, म्हणून स्वतंत्र एक रूम, दोन रूम तर काही वन बीएचके असलेले घर, फ्लॅट भाड्याने घेतात.

विशेष म्हणजे या ठिकाणीच्या क्लासेस जवळील अनेक रहिवाश्यांनी आपल्या घरावर मजले चढवून विद्यार्थी व पालकांना हवी असतील, अशी घरे तयार केली आहेत. विद्यार्थी व पालकांच्या गरजेचा फायदा घेत घरमालकांनी खोली व घरभाड्यात दुपटीने वाढ करत एक महिना आगाऊचे भाडे घेऊन घर भाड्याने दिले जाते. तर अनेक घरमालकांनी छोट्या - छोट्या रुममध्ये दोन, तीन व चार बेडची व्यवस्था करुन अव्वाच्या सव्वा भाडे आकारुन विद्यार्थ्यांना खुराड्यात कोंबड्याप्रमाणे कोंबून ठेवत आहेत.

अनेकांनी आपल्या घरालाच वसतीगृह बनवून विद्यार्थ्यांच्या राहण्याची, जेवणाची व इतकेच नव्हे तर क्लासेसपर्यंत ने - आण करण्याची व्यवस्था देखील केली असून वर्षभराचे पूर्ण भाडे आधीच घेऊन मोकळे झाले आहेत. परिस्थिती चांगली असणाऱ्या पालकांनी पाल्यांच्या सुव्यवस्थेसाठी कुटुंबासह गाव सोडून दोन वर्षे या महानगरात राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांना दोन रुमचे सात हजार रुपये, वन बीएचकेचे अकरा हजार रुपये भाडे भरावे लागत असून या सर्व प्रकारावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने घरमालकांचे फावत आहे. 

कोरोनाचे संकट पंधरवड्यात किंवा एका महिन्यात संपेल असे वाटल्याने पालकांनी भाड्याने घेतलेली घरे न सोडता तशीच ठेवली. परंतु कोरोनाच्या संकटामुळे गेल्या तीन महिन्यापासून कोचिंग क्लासेस बंद असल्यामुळे भाड्याच्या घरात न राहता ही काही घरमालक घरभाड्याचा तगादा लावून मागणी करत आहेत. यामुळे अनेकजण आर्थिक फटक्यातून वाचण्यासाठी भाड्याची घरे सोडून परत आपल्या गावी परतत आहेत.

येथे क्लिक करा -  जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांत चौघांचा मृत्यू

कोचिंग क्लासेस चालकांनी बारावीत शिकणाऱ्या पाल्यांची आधीच फी वसुल केली आहे. काही महिने क्लासेस बंद राहिल्यास पालकांच्या आर्थिक फटक्यात आणखी भर पडणार असल्याने संबंधितांनी कोरोना काळातील घरभाडे न घेता त्यात सूट देऊन दिलासा देण्याची मागणी पालकांमधून होत आहे.
 

 

माझा मुलगा बारावीच्या तयारीसाठी लातूर येथे गेला होता. राहण्यासाठी दोन रुमसाठी साडेआठ हजार रुपये प्रती महिना भाडे देत होतो. मार्च महिन्यापासून  क्लासेस बंद असले तरी घरमालकाने घरभाड्यासाठी तगादा लावला व भाडे घेतले. क्लासेस सुरु होण्याची शाश्वती नसल्याने आर्थिक फटका बसू नये, म्हणून भाड्याचे घर सोडून सर्व सामान वापस आणले आहे.
- विष्णू जटाळे, पालक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student rent hits parents financially! - How to read it,Nanded News