विद्यार्थी हा केंद्र बिंदु मानून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील रहावे- डॉ. अभय वाघ

प्रल्हाद कांबळे
Thursday, 28 January 2021

कुशल अभियंता म्हणून त्याला आपले योगदान चांगल्या पद्धतीने देण्यासाठी तंत्रशिक्षणाचा पाया मजबूत  करण्याची जबाबदारी पदविका संस्थांची आहे

नांदेड : कोरोनाची पार्श्वभूमी असतानाही यावर्षी तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत पदविका प्रवेश वाढविण्यात गतवर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणावर यश मिळाले आहे. नुसते प्रवेश वाढविणे पुरेसे नाही तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढवून तज्ज्ञ आणि कुशल अभियंता म्हणून त्याला आपले योगदान चांगल्या पद्धतीने देण्यासाठी तंत्रशिक्षणाचा पाया मजबूत  करण्याची जबाबदारी पदविका संस्थांची आहे. यासाठी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदु मानणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण प्रसंगी शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे ते बोलत होते.

कालानुरूप आवश्यक बदल सर्वांनी अंगिकारणे गरजेचे असून कोरोना काळात निर्माण झालेली आव्हाने पेलण्यासाठी नवनवीन अध्यापन कौशल्ये व आनुषंगिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची निकड त्यांनी विषद  केली. वर्क फ्रॉम होम मूळे कामाची गुणवत्ता वाढल्याचा दाखला त्यांनी याप्रसंगी दिला. पदविका शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नौकरीसाठी गुणवंत विद्यार्थी निवडण्यासाठी कंपन्या परिसर मुलाखती घेतात. विविध कारणास्तव  नामांकीत कंपन्या मोठ्या शहरातील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाच प्राधान्य देतात. आपला ग्रामीण भागातील विद्यार्थी चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन आणि क्षमता असूनही संधी न मिळाल्याने अशा कंपन्यांच्या मुलाखतीपासून वंचीत राहतो याअडचणीचे निराकरण करण्यासाठी FLIP TPO ही नवी संकल्पना पुढील काळात  पदविका अभियांत्रिकी स्तरावर राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अभय वाघ यांनी यावेळी दिली.

कोवीड -19 च्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अणुविद्युत या शाखेला 100  टक्के प्रवेश झाल्याबद्दल संस्थेचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे व  संपूर्ण प्रवेश समितीचे अभिनंदन केले. ध्वजारोहणापूर्वी सहसंचालक महेश शिवणकर यांनी  संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामुहीक वाचन करून घेतले. संचालक डॉ. अभय वाघ यांच्या हस्ते संस्थेतील   व्यायाम शाळेचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. एस. ए. कुलकर्णी यांनी केले. यावेळी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्य प्रा. पी. डी. पोपळे, प्रा. डी. एम. लोकमनवार, प्रा. आर. एम. सकळकळे, प्रा. व्ही. व्ही. सर्वज्ञ प्रा. एस. पी. कुलकर्णी, प्रा. एस. एम. कंधारे, डॉ. एस. एस. चौधरी, प्रा. एस. आर. मुधोळकर प्रा. एस. एन. ढोले, डॉ. जी. एम. डक, प्रा. ए. बी. दमकोंडवार, पी. बी. शेवलीकर यांनी प्रयत्न केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students should always strive for its overall development with this as the focal point abhay wagh nanded news