Success Story: टोकन पद्धतीने तूर लागवड; भरघोस उत्पन्नाची हमी! माहूर तालुक्यातील गोंडवडसा येथे यशस्वी प्रयोग

file photo
file photo

वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : माहूर तालुक्यातील गोंडवडसा येथे सोयाबीन पिकात आंतरपीक म्हणून तुरीची टोकण पद्धतीने लागवड करुन सेंद्रिय खत, कीटकनाशकांचा वापर करुन जैविक शेती करण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला होता. यात विशेष म्हणजे तुरीवर सर्वत्र मर रोगाचा प्रादुर्भाव असताना या शेतात मर रोगाची कुठेच लागण झाली नाही व प्रत्येक झाडाला तुरीच्या शेंगा लगडून लागल्याने शेतकऱ्याला भरघोस उत्पादनाची हमी मिळाली आहे.

बदलत्या नैसर्गिक वातावरणात जमिनीमध्ये बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने जमिनीची पोत खालवली आहे. परंतु यासोबतच शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नवनवीन प्रयोग करुन अधिक उत्पन्न कसे घेता येईल याचे धडे गिरवीत असल्याने प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतामधील पिकांवर उद्भवणाऱ्या आजारांवर मात करता येते. याचे मूर्तिमंत उदाहरण माहूर तालुक्यातील गोंड वडसा (रामू नाईक तांडा) येथील तरुण शेतकरी दीपक देवसिंग राठोड याने तुरीच्या यशस्वी प्रयोगातून दाखवून दिले आहे. नवीन तंत्रज्ञानाने शेतीची मशागत करून सोयाबीनची बीबीएफ पद्धतीने पेरणी करुन आंतरपीक म्हणून तूरीची टोकन पद्धतीने पेरणी केली. परिसरातील इतर तूर पिकांच्या तुलनेत आज या तूर पिकाची पाहणी केली असता एका झाडास पाच ते सहा दाणे असलेली पाचशे ते सहाशे शेंगा झाडाला लगडून आहेत. 

विशेष म्हणजे शेतकऱ्याने तुरीच्या बियाण्यावर बीज प्रक्रिया करुन संपूर्ण जैविक पद्धतीने लागवड व कीटकनाशक फवारणी केल्याने ही तूर वर्षातून दोन वेळा भरघोस उत्पन्न देणारी आहे. तत्पूर्वी याच शेतकऱ्याने सोयाबीनच्या एक बॅग एकरीमध्ये अकरा क्विंटलचा उतारा घेत सात बॅगला ७३ क्विंटल चे उत्पन्न घेतले आहे. बुरशीजन्य आजारामुळे माहूर तालुक्यातील अधिकांश शेतामधील तूर पिके उधडली आहेत. मर रोगाच्या प्रादुर्भावमुळे शेतकऱ्याच्या हातातून तूर पिकेही गेल्याचे चित्र असताना गोंड वडसा येथील शेतकऱ्याने जैविक पद्धतीने तुर पिकाचे व्यवस्थापन करुन भरघोस उत्पन्नाची हमी मिळविल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. परतीचा पाऊस बोंड सड, बोंडअळी व मर रोगाच्या आक्रमणामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांसाठी गोंड वडसा येथील तरुण शेतकऱ्याचा जैविक तूर प्रयोग दिलासादायक बातमी ठरत आहे.

गोंडवडसा सज्जा मधील शेतकऱ्याने ज्या पद्धतीने आंतरपीक म्हणून तूर टोकन पद्धतीने तूर लागवड केली. सेंद्रिय खते आणि कीटकनाशकांचा वापर करून पूर्णतः जैविक शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. अंतर पिकांमुळे लागत खर्च कमी होतो आणि अधिक प्रमाणात उत्पन्नाची हमी जास्त असते. शेतकऱ्यांनी अशे प्रयोग आत्मसात केल्यास भविष्यात त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार नाही. अधिक माहिती घेण्यासाठी तालुक्यातील शेतकरी गोंडवडसा (रामू नाईक तांडा) येथील दिपक राठोड यांच्या तूर प्लॉटवर जात आहेत.
- सुधीर राजूरकर, कृषी सहाय्यक, सज्जा गोंडवडसा

नवीन तंत्रज्ञानानुसार सोयाबीन पिकात आंतरपीक म्हणून तुरीची टोकण पद्धतीने ९×१ अंतराने लागवड केली होती. संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने तूरीवर फवारणी केली असून आज रोजी प्रत्येक झाडाला पाचशे ते सहाशे शेंगा हमखास आहे. कृषी सहाय्यक राजूरकर यांच्या मार्गदर्शनात केलेला प्रयोग मला भरघोस उत्पन्न देणारा ठरला आहे.
- दिपक देवसिंग राठोड, शेतकरी गोंडवडसा (रामू नाईक तांडा)

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com