
या दोघांनीही आरोपींना बिलोली न्यायालयाने ता. १६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले आहे.
नांदेड : बिलोली शहरात ता. नऊ डिसेंबर रोजी शौचालयासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मूकबधिर युवतीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी एका आरोपीला अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या दोघांनीही आरोपींना बिलोली न्यायालयाने ता. १६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केल्याचे पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बिलोली शहरात एका अल्पवयीन मूकबधिर युवतीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार करुन तिचा दगडाने ठेचून खून केला होता. या घटनेनंतर बिलोली पोलिस ठाण्यात खून, अत्याचार यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता. पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर काही तासाच्या आत बिलोली शहरातून एका आरोपीस अटक केली होती. याप्रकरणातील तीन आरोपी फरार होते. त्यापैकी दोन आरोपींना सोमवारी (ता. ११) अटक केली आहे. या दोघांनीही गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
सहा पथकांनी तेलंगना, महाराष्ट्र व आंध्रप्रदेश पिंजून काढला
नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी सहा पथकांची नेमणूक केली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनीही आपली टीमला आदेश देऊन कार्यरत केले होते. या पथकांनी तेलंगणातील निजामबाद, कामारेड्डी, निर्मल तसेच परभणी जिल्ह्यातील पूर्णा, नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, उमरी, मुदखेड, हिमायतनगर आदी भागात आरोपींचा कसून शोध घेतला होता.
पथकाचे कौतुक
गुप्त माहितीवरुन ता. ११ जानेवारी रोजी यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली. बिलोली पोलिसांनी या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ता. १६ जानेवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत पाठवले आहे. या गुन्ह्यात अट्रासिटी कायदा कलम वाढ झाल्याने या गुन्ह्याचा तपास आता डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्याकडे देण्यात आला आहे. पथकातील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री केंद्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक करीम पठाण, फौजदार सय्यद झाकीकोरे यांच्यासह अमलदार कोतापल्ले, नरावाड, अचेवाड, कर्ने, शिवनकर, झेलेवाड, सोनकांबळे यांनी परिश्रम घेतले. या गुन्ह्यातील आरोपींना अटक करणाऱ्या पथकाचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी कौतुक केले आहे. लवकरच तिसऱ्या आरोपीला अटक करु असा विश्वास श्री शेवाळे यांनी व्यक्त केला.