तोंडाला पाणी सोडणाऱ्या अर्धापूरच्या गुलाब जामुनची चवच न्यारी, घेतली समुद्रपार भरारी

file photo
file photo

अर्धापूर  ( जिल्हा नांदेड ) : काही गावांची एक विशिष्ट अशी ओळख तेथील मंदिर, ऐतिहासिक वारसा, फळे, खाण्याचे पदार्थ अशा विविध बाबींनी निर्माण होत असते. अशीच ओळख अर्धापूर शहराची प्रसिद्ध गुलाब जामुनमुळे जिल्ह्यासह राज्यभरात निर्माण झाली आहे. तसेच राज्याबाहेर व विदेशातही खवय्यानी चव चाखली आहे. ताज्या खव्यापासून बनवलेले रसभरीत जामून खवय्यांसाठी एक अपूर्व अशी मेजवानीच असते. जामुनच्या खवय्यांसाठी अर्धापूर म्हणजे पंढरीच होय.

अर्धापूर तालुका जसा राज्यभर केळीसाठी प्रसिद्ध आ. तसाच तो जामूनसाठी ओळखला जातो. शहरातील जामूनच्या प्रसिद्धीला फटाले परिवाराचे खूप मोठे योगदान असून त्यांच्यामुळे याची जव जिल्ह्यासह राज्यभर गेली आहे. शहरात जेंव्हा मोजकेच उपहारगृह होते तेव्हा कै. दामोधर फटाले यांचे प्रसिद्ध गुलाब जामून चविने व आग्रहाने खाल्ले जात होते. त्यांची एक खास अशी जामून करण्याची पध्दत होती. जामुनसाठी शुध्द तुपाचा वापर करीत होते. त्यांच्या जामुनच्या चवीचे किस्से आजही सांगितले जातात.

अर्धापूरी गुलाब जामुनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे वापरण्यात येणारा खव्वा. जामून तयार करण्यासाठी ताजा खव्वा, मैदा कमी, आकार मोठा व तळणीसाठी वापरण्यात येणारे तेल. जामून चांगले तळल्याने त्यात पाक जास्त शिरतो त्यामुळे चव आणखीनच वाढते. तसेच ग्राहकांना इतर शहराच्या तुलनेत कमी दरात जास्त वजनाचे जामून मिळतात.

शहरात येणा-या प्रत्येक पाहुण्यांच्या पाहूणचारात जामून हा हमखास पदार्थ असतोच. त्याच्याशिवाय मेजवानी पुर्ण होत नाही. तसेच पाहुणे परत गावी जाताना जामून घेवून जातात. अर्धापूरमार्गे नागपूरसह इतर राज्यात व शहरात जाणारे प्रवासी अर्धापूरला थांबून हमखास जामूनची चव घेत असतात. शहरातील प्रमुख उपहारगृहात जामून उपलब्ध असतात. सण, उत्सव, मंगल प्रसंगी जामून हमखास केले जातात.

जामून तयार करण्यासाठी मुख्य घटकात खव्वा महत्त्वाचा असल्यामुळे शहरात दुग्ध व्यवसायाला चालना मिळाली आहे. येथील उपहारगृहाला मागणी प्रमाणे तसेच घरगुती ग्राहकांना खव्वा मागणीप्रमाणे उपलब्ध करुन दिला जातो. तसेच बासुंदी, दही, तुपही चांगल्या प्रतिचे मिळते. दुग्ध व्यवसायात आता तरुण आले आहेत.

अर्धापूरी जामून खास पध्दतीने तयार केले जातात. साखर, मैदा, खव्वा याचे योग्य प्रमाण ठेवले जाते. तसेच ताजा खव्वा मैद्याच्या तुलनेत जास्त वापरण्यात येतो. त्यामुळे चवदार होतात. तसेच तळतांना विशेष काळजी घेण्यात येते. आमच्या जामूनची चव राज्यातील मोठ्या लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. तसेच हैदराबाद, मुंबईसह थेट अमेरिकेपर्यंत जामून पोहंचला आहे अशी माहिती उपहारगृह चालक रशीद काजी यांनी दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com