वेतनाच्या मागणीसाठी शिक्षकाने मांडला शाळेतच संसार

लक्ष्मीकांत मुळे
Tuesday, 6 October 2020

ज्या शाळेत आध्यापणाचे काम केले त्याच शाळेत वेतनासाठी शिक्षकाला संसार थाटवा लागला आहे.

अर्धापूर (नांदेड) : शहरातील एका खासगी गर्ल्स हायस्कूलमध्ये 22 वर्षापासून शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकाला हक्काच्या वेतणासाठी वणवण भटकंती करावी लागत असून कंटाळलेल्या शिक्षकाने 11 वर्षाचे वेतन व अनामत रक्कम परत मिळावी. या मागणीसाठी आपला संसार चक्क शाळेतच थाटला आहे. संसार उपयोगी साहित्य व मुलांसोबत आपले बि-हाड शाळेतच थाटले आहे. पिडीत शिक्षकाने वेळोवेळी शिक्षण विभाग, संस्थाचालकाला निवेदन देवून वेतन देण्याची मागणी केली आहे. तसेच न्यायालयात दाद मागितली आहे.

आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विविध मार्गाने आंदोलन, उपोषण, निवेदन, आदी मार्गाने आंदोलन करण्यात येते. कधी गांधीगिरी करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात येते. ज्या शाळेत आध्यापणाचे काम केले त्याच शाळेत वेतनासाठी शिक्षकाला संसार थाटवा लागला आहे. सदरील पिडित शिक्षक आपल्या मुलासह गांधीगिरी करून सोमवारी सायंकाळपासून (ता.पाच) आंदोलन करित आहे. या अनोख्या आंदोलनाने जिल्हाचे लक्ष वेधले आहे.

नांदेड येथील एका माजी आमदारानीं अर्धापूर शहरांत गेल्या तीन दशकापासून गर्ल्स हायस्कूलमध्ये कार्यरत आहे. या शाळेत 22 वर्षांपूर्वी भास्कर लोखंडे हे  इंग्रजीचे शिक्षक म्हणून रूजू झाले आहेत. शाळा अनुदानित झाल्यावर पुर्ण वेतन मिळेल, या आशेवर अध्यापणाचे काम नेटाने करित आहेत. तसेच कुटूंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी खासगी शिकवण्या घेऊन दिवस काढली. यातच त्यांच्या पत्नीचा दुर्धर आजाराने मृत्यू झाला.

सध्या गेल्या सहा महिन्यापासून ताळेबंद असल्यामुळे खासगी शिकवण्या बंद झाल्या आहेत. घरखर्च व मुलांचे शिक्षण आदी खर्च भागत नाही. वेतनही नाही. अशी बिकट परिस्थिती उद्भविल्याने वेतन मिळावे, यासाठी पिडीत शिक्षकाने आपला संसार चक्क शाळेच्या एक वर्ग खोलीत थाटला आहे. यात संसार उपयोगी साहित्य, पंखा, गॅस, धान्य आदी रोज लागणा-या वस्तू आहेत.

भास्कर लोखंडे म्हणाले, मी गेल्या 22 वर्षापासून शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. शाळा अनुदानित झाल्यावर वेतन मिळेल अशी अपेक्षा होती. पण माझा अधिकार डावलण्यात आला. आर्थिक परिस्थितीमुळे पत्नीच्या आजारावर खर्च करू शकलो नाही, यातच तिचा मृत्यू झाला. वेळोवेळी निवेदन दिली, संस्था चालकांकडे दाद मागितली. तसेच न्यायालयात गेलो. सध्या बिकट परिस्थिती उद्भवल्याने माझ्या मुलांसह शाळेतील वर्ग संसार थाटला आहे. मला मानसिक त्रास देण्यात आला. वेतन व अनामत रक्कम मिळण्यासाठी शाळेत संसार थाटला आहे. रिक्त झालेल्या जागी नियुक्त करून वेतन देण्यात यावे, अशी वेळोवेळी मागणी केली. पण मला न्याय मिळाला नाही. 

संपादन - सुस्मिता वडतिले                            


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A teacher from Ardhapur is living in the school demanding salary