पुस्तकांचा खजिना अन् शिक्षकांच्या प्रेरणेने घडलो - आयुक्त डॉ. सुनील लहाने 

डॉ. सुनील लहाने
डॉ. सुनील लहाने

नांदेड - प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक महत्त्वाचा असून माझ्याही जडणघडणीमध्ये शिक्षकांचा वाटा मोठा आहे. त्याचबरोबर वडील शिक्षण विस्तार अधिकारी असल्यामुळे त्यांचा तसेच आई आणि थोरला भाऊ यांच्यामुळे वाचन आणि अभ्यासाची गोडी लहानपणापासूनच लागली तसेच शिक्षकांच्या मिळालेल्या प्रेरणेमुळे मी घडलो असल्याची भावना नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी व्यक्त केली.


ता. पाच सष्टेंबर अर्थातच शिक्षक दिन. त्यानिमित्त नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी त्यांच्या शालेय आणि महाविद्यालयीन काळातील आठवणींना उजाळा दिला. त्यांना घडविणाऱ्या शिक्षकांविषयीच्या भावना व्यक्त केल्या. आयुक्त डॉ. लहाने यांचे मूळ गाव लातूर जिल्ह्यातील माकेगाव (ता. रेणापूर) असून त्या ठिकाणी त्यांचे पहिली आणि दुसरीचे शिक्षण झाले. त्यानंतर तिसरीपासून ते पदव्युत्तर (पीजी) पर्यंतचे सर्व शिक्षण परभणीत झाले. तिसरी ते दहावीपर्यंत बालविद्यामंदिरला तर अकरावी आणि बारावीचे शिक्षण ज्ञानोपासक महाविद्यालयात झाले. त्यानंतर परभणीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तरचे शिक्षण झाले. शिक्षण झाल्यानंतर स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून त्यांची प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून निवड झाली. 

लहानपणीच पाया झाला पक्का
शाळेत असताना घराशेजारी जे. टी. मखमले हे शिक्षक राहत होते. त्यांचे घर म्हणजे ग्रंथालयच होते एवढी पुस्तके त्यांच्याकडे होती. त्यांच्यामुळे माझी वाचनाची गोडी वाढली. साहित्य, संस्कृती, कथा, कांदबऱ्यांपासून ते स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांपर्यंतचा खजिनाच होता. त्यांना वाचनाची आवड होती. त्याचबरोबर त्यांनी इतरांनाही वाचनाची गोडी लावली. त्या निमित्ताने मी अनेक महापुरुषांची पुस्तके, आत्मचरित्र वाचली. त्यामुळे मला त्यातूनही प्रेरणा मिळाली. त्यामुळे मखमले सरांच्या माध्यमातून माझा पाया लहानपणीच पक्का झाला. त्यामुळे त्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.  

परभणीत झाले शिक्षण
परभणीत मी अकरावी आणि बारावीचे सायन्स शाखेत शिक्षण घेतले. त्यावेळी महाविद्यालयात विद्यार्थीप्रिय शिक्षक वामनराव जाधव रसायनशास्त्र विषय शिकवत. सोप्या भाषेत शिकवण्याचा त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे त्यांची मला शिकविण्याची शैली आवडत असे. त्यांच्याकडून मला शिकायला मिळाले. त्यानंतर मी मराठवाडा कृषी विद्यापीठात विद्यापीठात शिक्षण घेत असताना प्रा. डॉ. आनंद देशपांडे चारठाणकर यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या सहवासातून आयुष्याला वळण मिळाले. त्याचबरोबर इतरही अनेक शिक्षक, प्राध्यापकांनी आमच्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न केला. 

वडील, मोठ्या भावाचे मार्गदर्शन
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे माझे वडील मुख्याधापक होते. आई गृहिणी होती पण तिचे नेहमी आमच्यावर लक्ष असायचे. खूप शिका, मोठे व्हा, असे ती सांगायची. वडील नंतर शिक्षण विस्तार अधिकारी झाले. ते कडक शिस्तीचे असले तरी तितकेच प्रेमळ होते; तसेच थोरल्या भावाने देखील शिक्षकाची भूमिका बजावली. तो देखील मंत्रालयात मोठ्या पदावर आहे. त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यासात मोलाची मदत झाली असल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com