
K Chandrashekar Rao : तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांची नांदेडमध्ये उद्या सभा
नांदेड : तेलंगणातील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षातर्फे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची येथे रविवारी (ता. ५) सभा होत असून यानिमित्ताने पक्षाचा महाराष्ट्रातील राजकारणात प्रवेश होणार आहे. राज्यातील प्रस्थापित पक्ष तसेच सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात राजकीय समीकरणे बदलणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
‘बीआरएस’ ला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर आता फक्त तेलंगण राज्यापुरते मर्यादित न राहता देशभरात पक्षाचा प्रचार, प्रसार व्हावा, यासाठी नियोजन सुरू केले आहे. तेलंगणात गेल्या आठ दहा वर्षांत मुख्यमंत्री राव यांनी केलेल्या विकासकामांचे दाखले दिले जातात.
ते लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या सीमेवरील नागरिकांनीही तेलंगणच्या धर्तीवर आम्हाला सुविधा द्या किंवा आमच्या भागाचा समावेश त्या राज्यामध्ये करा, अशी मागणी केली होती. त्यावर बरीच चर्चाही झाली होती. ही मागणी आणि सीमावर्ती भागातील नागरिकांच्या नाराजीचा फायदा घेण्याचाही ‘बीआरएस’चा प्रयत्न असणार आहे.