सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का...?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

नायगाव तालुक्याची पावसाची सरासरी ९१५ मी.मी. आहे. पण मागच्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पावसाची सरासरी कमी झाली आणि अंतिम पैसेवारी ५० टक्केच्या आत आल्याने दुष्काळी सवलती लागू होतील आणि पिक विमा मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र पिक कापणीच्या वेळी उपस्थित असणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी तोंडाला कुलूप घातल्याने शेतकऱ्यांच्या पदरात पिक विमा पडला नाही. पिक कापणी प्रयोगाच्या वेळी उपस्थित असलेल्या पुढाऱ्यांनी त्यावेळी तोंडही उघडले तर नाहीतच पण पिक विमा शेतकऱ्यांना मिळाला पाहीजे याबाबत चकार शब्दही काढत नाहीत.

नायगाव, (जि. नांदेड) ः पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने शेतकरी आडचणीत आलेले असतांना आता पावसाने दडी मारल्याने अस्मानी संकटाची भिती वाढत आहे. मृग नक्षत्र निघून तब्बल २० दिवस होत आले तरी अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोक्यात चिंतेचे ढग दाटले आहेत. मॉन्सून आला पण पाऊस गायब झाल्याने वरुणराजा शेतकऱ्याची सहनशीलता तर पाहत नाही ना असे वाटत आहे.

 

हेही वाचा -  खते, बियाणांचे ३३० नमुने प्रयोगशाळेकडे, अहवालाची प्रतिक्षा...

 

लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र खिळखिळे झालेले असतांना नायगाव तालुक्यातील शेतकरी मे महीण्याच्या शेवटपर्यंत पावसाळी पुर्व कामे उरकून पेरणीसाठी शेती तयार ठेवली होती. वेगवेगळ्या संस्था हवामानाच्या बाबतीत सकारात्मक भकीत व्यक्त केले असल्याने शेतकरी आनंदी होते. पेरणीसाठी शेती तयार करुन ठेवलेले शेतकरी बी-बियाणे खरेदी करण्यासाठी बाजारात बरीच गर्दी केली होती. बी-बियाणांच्या खरेदीनंतर थोड्याबहूत झालेल्या पावसावर पेरणीही उरकली. सुरवातीला झालेल्या पावसामुळे पेरण्या झाल्या पण नंतर मात्र पावसाने दडी मारली. शेतकरी अद्यापही दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे.
शेती ही निसर्गाच्या लहरी पावसावर अवलंबून असल्याने तो आतबट्याचा खेळ झाला आहे. पण शेती करावीच लागते त्यामुळे शेती केल्या जात आहे. मात्र याकडे शास्वत रोजगार म्हणून आजही पाहील्या जात नाही हे दुर्दैव आहे. आणि त्याला कारणही तसेच आहे त्यामुळे शेती हा सरकारसाठी नेहमीच दुर्लक्षित घटक ठरला आहे हे विशेष. शेती आणि शेतकरी यांच्यासाठी घोषणांचा पाऊस होतो पण अंमलबजावणीच्या बाबतीत मात्र नेहमीच दुष्काळ असल्याने शेतकरी आजपर्यंत सशक्त झाला नाही.

नुकसानीबरोबरच दुबार पेरणीचे संकट
सरकार शेतकऱ्यांना सशक्त तर होवू देतच नाही. पण निसर्गही शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येण्यासारखी परिस्थिती राहीली नाही. मृग नक्षत्र निघून २० दिवसाचा कालावधी होत आहे, पण नायगाव तालुक्यात अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. मागच्या आठ दिवसांपासून ढग दाटून येत आहेत पण पाऊस मात्र पडत नाही. यंदा तरी निसर्ग साथ देईल या भरवश्यावर शेतकऱ्यांनी महागाडे बियाणे खरेदी केली आणि दमदार पावसाची वाट बघत आहे मात्र पाऊस कुठल्याही अटीविना पडण्यास तयार नाही अंशतः पडत आहे. एकीकडे पावसाने भुल दिली तर दुसरीकडे पेरलेले सोयाबीन उगवत नसल्याने अर्थिक नुकसानीबरोबरच दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

मानव निर्मित संकटामुळे शेतकरी हैराण
मृग नक्षत्राच्या १५ दिवसानंतर राज्यात कोकणमार्गे मॉन्सूनचे आगमण झाले पण तब्बल मागील १५ ते २० पासून दिवसापासून अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे नदी, नाले, ओढे कोरडेच आहेत. एकीकडे दमदार पाऊस नाही दुसरीकडे पूरलेले उगवले नाही या दुहेरी चक्रात शेतकरी अडकला आहे. त्याचबरोबर दमदार पाऊस नसल्याने उन्हाचे चटके जाणवू लागले असून या चटक्यामुळे प्रचंड उकाडा वाढला आहे. या वाढलेल्या उन्हाच्या तिव्रतेमुळे जे काही उगवलेले कोवळे मोड सुकण्याच्या मार्गावर आहेत. मानव निर्मित संकटामुळे शेतकरी हैरान असतांना आता आस्मानी संकट शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत तरी पाहत नाही ना असे वाटायला लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tell Me Bholanath Will It Rain, Nanded News