‘या’ तालुक्यात दहा दिवसांचा जनता कर्फ्यू

सुनिल पौळकर
Friday, 11 September 2020

जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या वाढीचा दर सध्या मुखेड तालुक्यात असून अनेक मोठ्या व प्रतिष्ठित व्यक्तींचे कोरोनामध्ये निधन झाले आहे. यातच मागील दहा-बारा दिवसांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव झालेले प्रतिष्ठित व्यापारी अनिल रामराव कोत्तावार यांना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. ही बाब शहरात समजताच लहान-मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
 

मुखेड, (जि. नांदेड)ः शहरात रुग्णसंख्येने दिवसेंदिवस वाढ होत असतानाच गुरुवारी (ता.दहा) सायंकाळी एका व्यापाऱ्याचे औरंगाबाद येथे निधन झाले. यामुळे धास्तावलेल्या व्यापाऱ्यांनी आमदार, तहसीलदार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता.११) आर्यवैश्य मंगल कार्यालयामध्ये तातडीची बैठक घेऊन पुन्हा (ता.१३ ते २१) सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू करत लॉकडाउन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. 

तातडीची बैठक 
जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या वाढीचा दर सध्या मुखेड तालुक्यात असून अनेक मोठ्या व प्रतिष्ठित व्यक्तींचे कोरोनामध्ये निधन झाले आहे. यातच मागील दहा-बारा दिवसांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव झालेले प्रतिष्ठित व्यापारी अनिल रामराव कोत्तावार यांना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. ही बाब शहरात समजताच लहान-मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. शुक्रवारी (ता.११) सकाळी आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आर्यवैश्य मंगल कार्यालयामध्ये व्यापारी, डॉक्टर्स, नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार आदींची तातडीची बैठक घेण्यात आली.

 

 

हेही वाचा -  नांदेड : पिककर्ज वाटपाचे प्रमाण कमीच, जिल्ह्यात ३५ टक्के कर्ज वाटप

 

यावेळी बेफिकीरपणा याबाबत चिंता व्यक्त करत दहा दिवसांसाठी जनता कर्फ्यू करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष बाबूराब देबडवार, डॉ. दिलीप पुंडे, तहसीलदार काशीनाथ पाटील, पोलिस निरीक्षक एन.जी.आकुसकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, लिंगैक्य डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर व शहरातील माजी उपनगराध्यक्ष श्रीराम गरूडकर, अनिल कोत्तावार, रामराव दुय्येवाड-बेळीकर, शिवराज उमाटे, अरविंद गुंडावार, पईतवार, स्वामी आदींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

 

नीटच्या विद्यार्थ्यांसाठी शिथिलता
नीट व जेईई आदी परीक्षांच्या विद्यार्थ्यांना या जनता कर्फ्यूमध्ये ओळखपत्र दाखवल्यानंतर शिथिलता देण्यात येणार असून, जनता कर्फ्यूदरम्यान विनामास्क व सोशल डिस्टन्सिंग आदींचे पालन न करणे किंवा व्यापारी प्रतिष्ठाने उघडल्यास त्यांना त्याच जागी दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार व पोलिसांनी सांगितले. नागरिकांनी कटू कारवाई टाळण्यासाठी नियमांचे पालन करून कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten-Day Public Curfew, Nanded News