दस लाख रुपये दो, नही तो ठोक देंगे; नांदेडच्या बार मालकाला मागितली खंडणी, तिघांना पोलिस कोठडी

प्रल्हाद कांबळे
Thursday, 14 January 2021

शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या तांडा बारमध्ये खुशालसिंग नानकसिंग गील, जगपालसिंग सपुरे, बलविंदरसिंग सपुरे आणि सचिन पाटील हे मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दारु पिण्यासाठी तांडा बारमध्ये आले

नांदेड : येथील रेल्वे स्थानक परिसरातील एका बारमध्ये बसून मनसोक्त मद्य ढोसल्यानंतर बार मालकाला डॉन को पहचानता नही क्या असे म्हणून दहा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. १२) रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी चार जणांपैकी तिघांना अटक केली. तिघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत.

शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या तांडा बारमध्ये खुशालसिंग नानकसिंग गील, जगपालसिंग सपुरे, बलविंदरसिंग सपुरे आणि सचिन पाटील हे मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दारु पिण्यासाठी तांडा बारमध्ये आले. यावेळी त्यांनी बारमध्ये बसून मनसोक्त दारु रिचवली. बील द्यायच्या वेळी काउंटरवर येऊन बार मालकाला डॉन को पहचानता नही क्या असे म्हणत दहा लाख रुपयांची त्यांनाच खंडणी मागितली. या प्रकरणात बार मालक अनिकेत राठोड यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात वरील चार जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत यातील तिघांना अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठवले.

हेही वाचा - नांदेड : ग्रामपंचायत मतदान, मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
 
वाटमारी करुन कुटुंबाला लुबाडले 

नायगाव ते नांदेड रस्त्यावर दुचाकीवरून जाणाऱ्या एका कुटुंबाला तीन अज्ञात आरोपीने लुबाडले. यावेळी महिलेच्या जवळील पावणेतीन लाख रुपयांचे दागिने असलेली पर्स हिसकावून घेण्यात आली. या प्रकरणी उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुसूदन नारायणराव कुलकर्णी राहणार कुंडलवाडी हे ता. 11 जानेवारी रोजी सायंकाळी नायगाव ते नांदेड रस्त्यावरुन पत्नी आणि मुलासह बहिणीला भेटण्यासाठी नांदेडला येत होते. त्यांची दुचाकी कापसी गुंफा बसस्थानकसमोर आली असताना पाठीमागून काळ्या रंगाच्या एका दुचाकीवरुन अनोळखी तिघे जण आले. यावेळी त्यांनी कुलकर्णी यांचा रस्ता अडविल्याने कुलकर्णी भांबावून गेले. तोच एका आरोपीने कुलकर्णी यांच्या पत्नीच्या हातात असलेली पर्स हिसकावली. या पर्समध्ये सोन्या- चांदीचे दागिने आणि मोबाईल असा एकूण दोन लाख 85 हजार रुपयांचा ऐवज होता. त्यानंतर चोरट्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला याप्रकरणी उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री जगदाळे करत आहेत.

नांदेडच्या अधिकच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten lakh rupees no he will be beaten ransom demanded from Nanded bar owner, three remanded in police custody