कोरोनाला रोखण्यासाठी लोकसहकाऱ्याची नितांत गरज - अशोक चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अशोक चव्हाण

कोरोनाला रोखण्यासाठी लोकसहकाऱ्याची नितांत गरज - अशोक चव्हाण

नांदेड : लोकसहकार्याशिवाय कोरोनाला रोखणे शक्य नाही. राज्याचे प्रशासन मागील वर्षभरापासून कोरोनाविरुद्ध लढते आहे. डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करते आहे. त्यांच्या प्रयत्नांना लवकरात लवकर यशस्वी करायचे असेल तर नागरिकांनी प्रशासनाचे निर्देश आणि खबरदारीच्या उपायांचे काटेकोर पालन करुन सहकार्य करण्याची नितांत गरज असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. शनिवारी महाराष्ट्र दिन सोहळा संपन्न झाल्यानंतर जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना शुभेच्छा देताना ते बोलत होते.

महाराष्ट्र ही शुरविरांची भूमी आहे. अनेक मोठ- मोठी संकटे महाराष्ट्राने परतवून लावली आहेत. यापूर्वी आपण प्लेग, देवी, टीबीसारख्या अनेक आजारांचा मुकाबला केला आहे. त्यामुळे कोरोनावरही आपण नक्कीच मात करु, असा विश्वास पालकमंत्री चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. मागील काही वर्षात आपण पूर्वीच्या तुलनेत आरोग्य सुविधा अधिक सक्षम केल्या. परंतु, कोरोनाचा जोर इतका प्रचंड आहे की, संपूर्ण देशभरात आज सुविधा तोकड्या पडू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत संयम न सोडता नियोजनपूर्वक आणि सामुदायिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. प्रशासन आणि नागरिकांनी हातात हात घालून काम केले तर कोरोनाला रोखणे सोपे होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - पुयनी बु. येथे वीज पडून एका ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. दोन) एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेप्रमाणे राज्य हे रयतेचे असावे, हेच एकमेव उदिद्ष्ट डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचे सरकार काम करते आहे, असे सांगून पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा व इतर विकासात्मक कामांची थोडक्यात माहिती दिली.

महाराष्ट्र दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा मंगराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यंदा हा कार्यक्रम अगदीच मोजक्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

Web Title: The Need For Public Cooperation To Stop Corona Ashok

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top