esakal | वसमत तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

वीज पडून शेतकरी ठार

वसमत तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

sakal_logo
By
पंजाब नवघरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : तालुक्यातील पुयनी बु. येथे वीज पडून एका ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. दोन) एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. यावेळी तुफान वादळई वाऱ्यासह पाऊस सुरु झाला होता.

वसमत तालुक्यात मागील दोन दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. यासोबत जोराचा वाराही वाहत आहे. रविवारीही दिवसभर वातावरण ढगाळ होते. दुपारी तीन वाजेनंतर आकाशात गडद ढग जमा होण्यास सुरवात झाली होती. जोराच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरु झाला. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कौठा, बाभूळगाव, टेम्भुर्णी, वाखारी, लहान, लोण, हयातनगर, आरळ, गिरगांव, सुकळी, पिपला चौरे, पार्डी खु., कुरुंदा, वसमत शहर आदी भागात अवकाळी पावसास सुरवात झाली. यासोबत विजांचा कडकडाटही होता. याच वेळी तालुक्यातील पुयनी बु. शिवारातही विजांचा कडकडाटासह पावसास सुरवात झाली.

हेही वाचा - वसमत येथील कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना धीर देण्याचे काम चापके यांनी केले

याच दरम्यान येथील शेतकरी साहेबराव ब्रह्माजी जामगे हे शेतात हळदीचे बेणे झाकून ठेवत होते. पाऊस आल्याने त्यांनी झाडाखाली आसरा घेतला. यावेळी वीज कोसळून साहेबराव जामगे यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार अरविंद बोळनगे, भाजपचे पंचायत समिती सदस्य नाना जामगे यांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन विवाहित मुली, नातवंड असा परिवार आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने हळद, आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

वीज पडून बैल दगावला

तालुक्यातील हट्टा येथेही वीज पडून नारायण बापूराव देशमुख यांच्या शेतातील बैल दगावला. सायंकाळच्या सुमारास हट्टा परिसरातही जोरदार वाऱ्यासहविजांचा कडकडाट सुरु झाला होता. यामध्ये शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image