esakal | पवित्र रमजानचा दुसरा मगफीरत पर्व सुरु

बोलून बातमी शोधा

रमजान महिना

पवित्र रमजानचा दुसरा मगफीरत पर्व सुरु

sakal_logo
By
प्रा. इम्तियाज खान

नांदेड : पवित्र रमजान महिन्याचे दहा रोजे पूर्ण झाले असून पहिला पर्व रहेमत अल्लाह संपून दुसरा मगफीरत पर्व शुक्रवारपासून सुरु झाला आहे.

इस्लाम धर्मात अत्यन्त पवित्र मानला जाणारा रमजान मास मागील दहा दिवसापासून सुरु झाला आहे. मुस्लिम भाविकांना असीम ईश्वरकृपा व पुण्याई प्राप्तीचा हा पवित्र महिना आहे. ज्याला ईश्वराने माझा महिना म्हंटले आहे. इतर महिन्यात उपासकांच्या पुण्याईची नोंद ईश्वरदूत घेतात. परंतु रमजान या पवित्र महिन्याची पुण्याई ईश्वर स्वतः भाविकांना प्रदान करतो. यामुळे या पवित्र महिन्यात अबालवृद्ध, महिला, युवा व बालक या सर्वांमध्ये विशेष उपासनेचा एहतेमाम दिवस रात्र केला जातो. प्रत्येक पुण्य कार्याच्या सत्तरपट पुण्य केवळ याच महिन्यात ईश्वर प्रदान करतो. याच महिन्यात पवित्र कुराणचे अवतरण झाल्यामुळे ही या महिन्याची पवित्रता आणखीनच वाढली आहे. या महिन्यात पूर्ण तीस दिवस प्रत्येक सुजाण पुरुष महिला, युवक व बालक उत्साहाने रोजा ठेवतात. त्याच बरोबर नियमित नमाज पठण बरोबर विशेष तरावी नमाज पठण केले जाते.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यातील रस्त्यांसाठी केंद्राकडून १९७ कोटींचा निधी- प्रताप पाटील चिखलीकर

स्वतः पोटभरुन जेवणे व गरीब शेजारी भुकेला असेल तर अल्लाहला हे पसंत नाही

दिवस भर जिक्र, अस्तगफार, कुराण पठण आदी धार्मिक विधी सर्व भाविक या महिन्यात करुन ईश्वराकडे साकडे घालतात. या महिन्यात केवळ स्वतः भुकेले राहून दररोज भूक सहन करणाऱ्या गोर गरीब भुकेल्यांच्या भावना समजून त्यांना अन्नदान करणे व मदद करणे हे देखील या महिन्यात ईश्वराने अनिवार्य केले आहे. स्वतः पोटभरुन जेवणे व गरीब शेजारी भुकेला असेल तर अल्लाहला हे पसंत नाही. समाजातील धनिक व सक्षम लोकांना समाजातील गरीब भुकेल्यानं अन्नदान बरोबरच आपल्या अशी मिळकत जी मागील एक वर्षांपासून आगाऊ पडली आहे, तसेच सोने चांदी वगैरे आहेत या वर प्रत्येक महिला पुरुषाने त्यासाठी अडीच टक्के रक्कम जकात म्हणून दान करने अल्लाहने अनिवार्य केले आहे. अन्यथा ती रक्कम हराम होईल. यासाठी या पवित्र महिन्यात समाजातील सधन लोक सढळ हाताने अन्न व रक्कम दान करतात. समाजातील केवळ धनिकांनीच रोजे ठेवून ईद साजरी न करता समाजातील प्रत्येकाला ईद साजरी करुन अल्लाहचा शुक्र अदा करता यावा समाजात सामाजिक न्याय स्थापन व्हावे असा उदात्त हेतू अल्लाहच्या या फरमनात आहे.

रमजान महिन्याच्या दुसऱ्या पर्वात भाविकांचा भक्तीचा उत्साह द्विगुणित झाला आहे

लाकडाऊनच्या पार्श्वभूमीत हे दुसरे रमजान मुस्लिम भाविक साजरा करीत आहेत. पहिल्या वर्षी थोडी चिंता होती पण या महामारीचे गाम्भीर्य समजून या वर्षी प्रशासनाने दिलेल्या नियम व अटीचे काटेकोर अमल करुन व घरीच राहून मुस्लिम भाविक आप- आपल्या परीने अल्लाहची उपासना व साधना करीत आहेत. रमजान महिन्याच्या दुसऱ्या पर्वात भाविकांचा भक्तीचा उत्साह द्विगुणित झाला आहे. अबालवृद्ध महिला व बालक- बालिका रमजान महिन्याच्या दुसऱ्या पर्वात ईश्वराची मागफीरत क्षमा याचना करुन अल्लाहला प्रसन्न करण्यात मग्न झाले असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण जगाला त्रस्त करणाऱ्या या महामारीचा ईश्वर लवकर अंत करो व मानवतेची सुरक्षा करो. सर्वांना सुखी व दुर्घायू लाभो इशा प्रार्थना सर्व आबालवृद्ध करत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे