नांदेड बसस्थानकातून सव्वा तीन लाखाचे दागिने चोरले 

अभय कुळकजाईकर
Tuesday, 12 January 2021

नांदेड बसस्थानकात आफरीन सुलतान मोहमंद रहिमोद्दीन (वय ३९, रा. उदगीर) हे कुटुंबियांसह गावाला निघाले होते. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन महिलेकडील पर्स चोरट्यांनी नजर चुकवून चोरून नेली. पर्समध्ये असलेल्या डब्यात तीन लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने होते.

नांदेड - नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानकात महिला बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन तिची पर्स चोरट्यांनी लांबवली. त्या पर्समध्ये तीन लाख २० हजाराचे सोन्याचे दागिने होते. सदरील घटना सोमवारी (ता. ११) सकाळी पावणे नऊ ते नऊच्या दरम्यान घडली. 

नांदेड बसस्थानकात आफरीन सुलतान मोहमंद रहिमोद्दीन (वय ३९, रा. उदगीर) हे कुटुंबियांसह गावाला निघाले होते. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन महिलेकडील पर्स चोरट्यांनी नजर चुकवून चोरून नेली. पर्समध्ये असलेल्या डब्यात तीन लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने होते. सदरील घटना घडल्यानंतर त्यांनी आजूबाजूला तपास केला पण तोपर्यंत चोरटे फरार झाले होते. याबाबत वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार जाधव करत आहेत. दरम्यान, प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन बसस्थानक आणि परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवावा तसेच पोलिस चौकीत कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. 

हेही वाचा - जिंतूरच्या मीना वाघमारे-पांढरे यांनी गीता आपली मुलगी असल्याचा दावा केला आहे.

विष प्राशन करून युवतीची आत्महत्या 
नांदेड ः निमगाव (ता. अर्धापूर) येथील जयश्री संजय राठोड (वय १८) या युवतीने शनिवारी (ता. नऊ) विष प्राशन केल्यामुळे तिला विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याबाबत पोलिस जमादार आर. जे. बयास यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळाले नसून पुढील तपास पोलिस जमादार तिडके करत आहेत. 

जुगार खेळणाऱ्यांना धर्माबादमध्ये अटक 
नांदेड ः धर्माबादजवळील रत्नाळीमध्ये चिंतावार यांच्या शेतातील दर्गाजवळ सोमवारी (ता. ११) सायंकाळी सहाच्या सुमारास काहीजण विना परवाना आणि बेकायदेशिररित्या जुगार खेळताना आणि खेळविताना आढळून आले. पोलिसांनी छापा टाकून रोख सात हजार तीनशे रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याबाबत पोलिस जमादार भीमराव रेणके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस जमादार जाधव करत आहेत. 

हेही वाचलेच पाहिजे - या परिसरात हजारो एकरवर धना पिकाची पेरणी केल्यामुळे हा परिसर चोहीकडे कुठेही पाहिले तर पांढरी चादर पांघरून घेतल्यासारखे दिसत आहे

जागेच्या वादातून कुऱ्हाडीने मारहाण 
नांदेड ः गुरूकुलवाडी (ता. किनवट) येथे कैलास सखरू चव्हाण (वय ४०) हे घरासमोर बसले होते. त्यावेळी दोघांनी तेथे येऊन माझ्या वडिलांकडून घेतलेली जागा माझी आहे, असे म्हणत कैलास चव्हाण यांना कुऱ्हाडीने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (ता. दहा) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याबाबत इस्लापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जुन्या भांडणावरून एकास मारहाण 
नांदेड ः वसंतनगर भागात राजश्री शाहू शाळेच्या समोर रस्त्यावरील पानपट्टीजवळ भोला रामकिशन गोकुलवाले (वय ३०, रा. नाईकनगर) हा उभा होता. त्यावेळी आरोपितांनी त्याच्याजवळ येऊन जुन्या भांडणाच्या कारणावरून छातीवर, पोटावर मारून खाली पाडले तसेच लाथा बुक्याने पोटात मारहाण करून गंभीर दुखापत केली. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नायक चांदणे करत आहेत. 

नांदेडच्या ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

गावठी पिस्तुल बाळगणाऱ्यास अटक 
नांदेड ः वसंतनगर भागात सार्वजनिक रस्त्यावर चौकात पोलिसांनी सोमवारी (ता. ११) दुपारी साडेतीनच्या सुमारास एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विनापरवाना आणि बेकायदेशिररित्या गावठी लोखंडी पिस्टल आढळून आले. याबाबत पोलिस नायक लियाकत शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस जमादार मोरे करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three and a half lakh jewelery was stolen from Nanded bus stand nanded news crime