फुटपाथवरील तीन मुलांना मिळाला हक्काचा निवारा 

Nanded News
Nanded News

नांदेड - रस्त्याच्या कडेला आसरा घेणाऱ्या परिवाराबद्दल अनेकांना काही वेळापूर्ती का होईना सहानुभुती वाटते; मात्र थोड्या वेळाने गाडी पुढे निघुन गेल्याने ती व्यक्ती दुसऱ्याच कामात व्यस्त होते आणि उघड्यावर रहाणाऱ्यांबद्दलची समाजाची सहानुभुती अपसुकच गळुन पडते. हे अगदी वास्तव आहे. मात्र नायगाव तालुक्यात कुंचेली गावात कै. सोपानराव तादलापूरकर क्रीडा मंडळ व्यायाम शाळेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी लढा देणारे उच्चशिक्षित कैलाश गायकवाड यांनी रस्त्यावरील तीन बालकांना हक्काचा निवारा मिळवून दिला आहे. 

शहराला लागुन असलेल्या ढवळे कॉर्नर परिसरात एक आई आपल्या लहान मुलांसह बोचऱ्या थंडित फुटपाथवर राहुन कसेबसे जिवन व्यतित करत आहे. दरम्यान व्यसनमुक्ती जनजागृती करणारे कैलाश गायकवाड या रस्त्यावरुन जात असताना उघड्यावरचे हे निराधार कुटुंब त्यांच्या नजरेस पडले. रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या या मुलांचे आणि आईंचे होणारे हाल त्यांना पाहावले नाही. आठ दिवसानंतर कैलास यांचा याच रस्त्याने प्रवासाचा योग आला. तेव्हा त्यांनी १०९८ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करुन फुटपाथवर राहणाऱ्या बालाकांची माहिती कळवली, तेव्हा नांदेडच्या हेल्पलाईन कार्यालयाशी त्यांनी ही माहिती सांगितली.  

आईच्या मनाला पटत नव्हते

त्यानंतर काही वेळातच १०९८ हेल्पलाईनचे काम बघणाऱ्या श्रीमती जयश्री यांनी लगेच ढवळे कॉर्नरला येवून निराधार आई व त्या बालकांची भेट घेतली. त्यांनी मुलांच्या आईला मुलांच्या भविष्याबद्दल योग्य मार्गदर्शन करुन मुलांना बालगृहात पाठविण्याचा अग्रह केला. मात्र काळजाच्या तुकड्याला असे कसे कुणाच्याही हवाली करायचे? हे त्या आईच्या मनाला पटत नव्हते. म्हणून ती आई मुलांना सोडण्यास तयार होत नव्हती. 

निवाऱ्यासोबतच शिक्षण आणि संस्कार मिळणार 

मात्र श्रीमती जयश्री यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा - पुन्हा आईला विश्‍वासात घेत मुलांच्या सुरक्षित भविष्याचा हवाला देत त्या आईला रस्त्याच्या कडेला राहणारी आपली तिन्ही मुले बालगृहात पाठविण्यासाठी अखेर राजी केले. अथक परिश्रमानंतर अखेर ती आई मुलांना बालगृहात पाठविण्यास राजी झाली. गुरुवारी (ता. १७) डिसेंबरला तिन्ही मुले आईचे उघड्यावरचे छत सोडून हक्काच्या निवाऱ्यात राहण्यास गेले आहेत. जिथे या तिन्ही मुलांना हक्काच्या निवाऱ्यासोबतच शिक्षण आणि संस्कार मिळणार आहेत.

तिन्ही निरागस मुलांना हक्काचे घर 

समाजसेवक कैलाश गायकवाड आणि १०९८ हेल्पलाईनच्या मदतीने तिन्ही बालके बालगृहात जाऊन शिक्षण घेवून मोठे होणार आहेत. मात्र,  त्या आईचे काय? जी मुलांच्या सहाऱ्याने आणि मुले तिच्या सहाऱ्याने उघड्या छताखाली जिवन व्यतित करत होती. ती आज एकटी पडली आहे. असो, आज या तिन्ही निरागस मुलांना हक्काचे घर मिळाल्याचा मला खूप समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया कैलाश गायकवाड यांनी व्यक्त केले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com