
नांदेड : प्रचाराची रणधुमाळी सुरू
नांदेड : जिल्ह्यातील अर्धापूर, नायगाव आणि माहूर या तीन नगरपंचायतीसाठी येत्या मंगळवारी (ता. २१ डिसेंबर) मतदान तर बुधवारी (ता. २२) मतमोजणी होणार आहे. यंदाची निवडणुक देखील अटीतटीची आणि रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून पुन्हा एकदा आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरूवात होणार आहे.
अर्धापूर नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी ६५ उमेदवार रिंगणात आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे त्यामुळे कॉँग्रेस, भाजप, वंचित आणि एमआयएम स्वतंत्र निवडणुक लढवत आहेत तर शिवसेना आणि राष्ट्रवादीत युती झाली आहे. त्याचबरोबर कॉँग्रेसमधील तिघांनी बंडखोरी केली आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातील अर्धापूर नगरपंचायत असल्यामुळे त्यांचे या निवडणुकीकडे विशेष लक्ष राहणार आहे.
माहूर नगरपंचायतीमध्ये १३ जागांसाठी ६४ उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. या ठिकाणी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, एमआयएम, मनसे, प्रहार, वंचित या पक्षांसह अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी भाजपचे विद्यमान आमदार भीमराव केराम, राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्यासह इतरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नायगाव नगरपंचायतीमध्ये १२ जागांसाठी ३१ उमेदवार रिंगणात आहेत. सोमवारी (ता. १३) भाजपच्या दोन अधिकृत उमेदवारांनी अचानक माघार घेतल्याने कॉँग्रेसचे दोन सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. नायगावमध्ये भाजपचे विद्यमान आमदार राजेश पवार आणि कॉँग्रेसचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
स्वबळामुळे काय होणार?
नुकत्याच झालेल्या देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत महाआघाडी एकत्र राहिल्याने कॉँग्रेसचा विजय सोपा झाला आणि हा प्रयोग यशस्वी झाला. आता नगरपंचायत निवडणुकीत महाआघाडीत बिघाडी झाली असून स्वबळावरील नाऱ्यामुळे आता काय होणार? हेही महत्वाचे आहे. जिल्ह्यात कॉँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र, असे असले तरी त्यांना काही ठिकाणी स्वबळावर मर्यादा येतात तर दुसरीकडे शिवसेनेची ताकदही मागील काही वर्षात कमी झाली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे काही तालुक्यांवर आजही वर्चस्व आहे. भाजपकडून उमेदवार उभे असले तरी त्यात निष्ठावंत आणि नवे यांचाही विषय आहे. वंचित, एमआयएम, मनसे, प्रहार आदी पक्षांच्या उमेदवारांसह बंडखोर आणि अपक्षही रिंगणात असल्यामुळे निवडणुकीत रंगत वाढली आहे.
Web Title: Three Nagar Panchayat Election Campaign Begin
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..